BYJU’s च्या कार्यालयांवर ईडीची छापे, ED च्या हाती करोडोंचे घबाड?
लोकप्रिय ऑनलाईन पोर्टल बायजूच्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली आहे. छाप्यात ईडीच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : लोकप्रिय ऑनलाईन एज्युकेशन पोर्टल बायजूच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. ईडीने रवींद्रन बायजू आणि त्यांची कंपनी ‘थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्याविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) च्या तरतुदींखाली दाखल करत कर्नाटकातील बेंगळुरू येथील तीन ठिकाणी छापेमारी करत जप्ती केली. कंपनी Byju’s नावाने एक लोकप्रिय ऑनलाइन एज्युकेशन पोर्टल चालवते. झडती आणि जप्तीच्या कारवाईदरम्यान, विविध संशयास्पद दस्तऐवज आणि डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे. तसेच फेमाच्या सर्चमध्ये 2011 ते 2023 या कालावधीत कंपनीला 28,000 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचेही उघड झाले आहे. शिवाय, कंपनीने याच कालावधीत विविध परदेशी अधिकारक्षेत्रांना 9754 कोटी रुपये पाठवल्याचे एजन्सीने सांगितले.
2020 पासून आर्थिक विवरणपत्रे आणि खात्यांचे ऑडिट नाही
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावावर सुमारे 944 कोटी रुपये खर्च केले आहेत. ज्यात परदेशी अधिकारक्षेत्रात पाठवलेल्या रकमेचा समावेश आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 पासून आपली आर्थिक विवरणपत्रे तयार केली नसल्याचा आरोप आहे आणि अनिवार्य असलेल्या खात्यांचे ऑडिट केलेले नाही. यामुळेच कंपनीने दिलेल्या आकडेवारीची बँकेकडून पुनर्तपासणी केली जात आहे, असे एजन्सी पुढे म्हणाली.
अनेकदा समन्स बजावूनही कंपनीच्या साईओची चौकशीला दांडी
विविध खासगी व्यक्तींकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली होती. ईडीने केलेल्या तपासादरम्यान, संस्थापक आणि सीईओ रवींद्रन बायजू यांना अनेक समन्स बजावण्यात आले होते. मात्र रवींद्रन यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली. ईडीच्या छापेमारीनंतर बायजूच्या कायदेशीर टीमच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करत ही “फेमा अंतर्गत नियमित चौकशी” असल्याचे म्हटले आहे.