बलात्काराच्या आरोपीला 20 वर्ष कारावास, पोलिसांनी नराधमाला कोर्टातून दारु पार्टीला नेलं
पोलीस अधीक्षक आर राजा यांनी पार्टी करणाऱ्या नामदेव धनवडे आणि सत्यवान गर्जे या दोघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. (Beed Police Suspended Alcohol Party)
बीड : बलात्कार प्रकरणातील आरोपींसोबत दारु पार्टी करणाऱ्या बीडमधील दोघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमासोबत पोलिसांनी पार्टी केल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली होती. बलात्काराच्या आरोपीला 20 वर्षांचा कारावास सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टातून थेट दारु पार्टीसाठी नेलं होतं. (Beed Police Suspended for Alcohol Party with Rape Accuse)
गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार
बीड जिल्ह्यातील गतिमंद तरुणीवर आरोपीने लैंगिक अत्याचार केले होते. नराधमाला न्यायालयाने वीस वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या गुन्हेगाराला न्यायालयातून कारागृहात नेण्याची जबाबदारी सहाय्यक फौजदार नामदेव धनवडे आणि हवालदार सत्यवान गर्जे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर होती.
पोलीस अधीक्षक आर राजा यांची कारवाई
दोघा पोलिसांनी आरोपीला कोर्टातून कारागृहात घेऊन जाण्याऐवजी थेट मद्याचे हॉटेल गाठले. तिथे गुन्हेगारासोबतच त्यांनी पार्टी केल्याचं समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलीस अधीक्षक आर राजा यांनी पार्टी करणाऱ्या नामदेव धनवडे आणि सत्यवान गर्जे या दोघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
गाव कोमात प्रशासनाची पार्टी जोमात
गाव कोमात अन प्रशासनाची दारु पार्टी जोमात अशी परिस्थिती कोरोनाच्या संकटात सोलापुरात पाहायला मिळाली होती. कोरोनामुळे सोलापूर जिल्हाही प्रतिबंधित क्षेत्र असताना, वैराग ग्रामपंचायत कार्यालयात चक्क अधिकारी दारुची पार्टी करत असल्याचं गेल्या वर्षी मे महिन्यात समोर आलं होतं.
या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोलापूरचे पोलीस अधीक्षक बार्शी दौऱ्यावर आले असतानाच, अधिकाऱ्यांना दारु, गुटखा अशा अवैध धंद्यांवर कारवाई करा असा आदेश देऊन गेले होते. हे सर्व खोटं ठरवत प्रतिबंधित क्षेत्रात दारु येते, पार्ट्या होतात म्हणजे स्थानिक पोलिसांच्या कामाबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
संबंधित बातम्या :
गाव कोमात अन प्रशासनाची दारु पार्टी जोमात, सोलापुरात ग्राम पंचायतीत अधिकाऱ्यांची दारु पार्टी
इशकजादे!! आधी दारु प्यायले, मग एकमेकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या!
(Beed Police Suspended for Alcohol Party with Rape Accuse)