Crime News : चोरी करण्याचा प्रयत्न फसला, सीसीटिव्हीमध्ये स्पष्ट दिसला, मग मात्र पोलिसांनी…
एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात, लाखनी येथील प्रकार उजेडात, सीसीटीव्हीच्या आधारे लागला सुगावा...
भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी शहरातील (Lakhani city) स्थानिक राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या ई-गॅलरी मधील दोन एटीएम मशीन (ATM machine) फोडण्याचा प्रयत्न मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याचा फसला. मात्र हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या प्रकरणी लाखनी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत चोरट्याला अटक केली आहे. संदीप जयराम निर्वाण (24) रा.लाखोरी असे आरोपीचे नाव आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. कारण त्याचा अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याची शंका पोलिसांना आहे.
लाखनी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील आरोपी संदीप निर्वाण याने तीन पैकी दोन एटीएम मशिनचे संपूर्ण वायरिंग व तीन ट्यूबलाइट फोडून चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एटीएम हे राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याने वाहन व नागरिकांची आवक-जावक असल्याने चोरी करण्याचा प्रयत्न फसला. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर शाखा व्यवस्थापक विकास कुमार यांच्या फिर्यादी वरून लाखनी ठाण्यात गुन्ह्याची नोद केली. दरम्यान लाखनी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास करीत अवघ्या काही तासात त्या चोरट्याला जेरबंद केले आहे.
आतापर्यत देशात अनेक चोऱ्या किंवा चोरीचा प्रयत्न फसल्याचं सीसीटिव्हीच्या माध्यमातून उघडकीस आलं आहे. त्याचबरोबर आरोपींना सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेकांना शिक्षा सुध्दा झाली आहे. भंडारा जिल्ह्यात एकाला ताब्यात घेतल्यामुळे अनेक प्रकरण उजेडात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.