BHANDARA : आयपीएलच्या सट्टेबाजाला मुद्देमालासह अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आयपीएल सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात अशा अनेक ठिकाणी करावाया करण्यात आल्या आहेत. प्रत्येकवर्षी सट्टेबाजांवरती पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. संबंधित अजून एक आरोपी गायब असून तो सापडल्यानंतर मोठं रॅकेट उघडकीस येण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
भंडारा – एका हॉटेलच्या पाठीमागे आयपीएलची (Ipl 2022) सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी अचानक छापा घातला, त्यावेळी त्यांनी एकाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात हॉटेलचा मालक हॉटेलच्या मागच्या बाजूला सट्टेबाजी करीत असल्याची माहिती पोलिसांनी (police) दिली आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील करडी येथील ही घटना आहे. अविनाश केशव बावनकर (Avinash bawankar) असं ताब्यात घेतलेल्या हॉटेल मालकाचं नाव आहे. तसेच छापेमारी सुरू असताना तिथून अजून एकजण पळून गेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.
आरोपीला मुद्देमालासह अटक
अविनाश यांचे करडीत अविनाश रेस्टॉरंट आहे. तिथून अविनाश हा तुमसर येथील शेखर उर्फ सोनू अग्रवाल याच्या सांगण्यावरून आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर पैशाची हारजीतची बाजी लावतो. तसेच नागरिकांकडून पैसे घेऊन आकड्यांचा खेळ करतो अशी माहिती भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या गुप्त माहितीवरून भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून छापा घातला. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अविनाश बावनकर याच्या ताब्यातून दोन मोबाईल हँडसेट, आयपीएलचे आकडे लिहिलेली पट्टी व साहित्य, रोख 2 हजार 350 रुपये, असा मुद्देमाल ताब्यात घेतला. अविनाशविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दूसरा आरोपी शेखर उर्फ सोनू अग्रवाल याचा शोध गुन्हे शाखेचे पथक घेत आहे.
मोठ रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
आयपीएल सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात अशा अनेक ठिकाणी करावाया करण्यात आल्या आहेत. प्रत्येकवर्षी सट्टेबाजांवरती पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. संबंधित अजून एक आरोपी गायब असून तो सापडल्यानंतर मोठं रॅकेट उघडकीस येण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.