Bhandara SP : पीडितेवरील बलात्कार प्रकरण, भंडारा पोलीस अधीक्षकांची 2 अधिकाऱ्यांवर कारवाई, PSI दिलीप खरडे व API लखन उईके निलंबित
पीडितेवरील बलात्कार प्रकरणी लाखनी पोलीस प्रकरणात भंडारा पोलीस अधीक्षक लोहित यांनी 2 अधिकाऱ्यांना निलंबित केले. पीएसआय दिलीप खरडे व एपीआय लखन उईके अशी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत.
भंडारा : पीडितेवरील बलात्कार प्रकरणी लाखनी पोलीस प्रकरणात भंडारा पोलीस अधीक्षक लोहित यांनी 2 अधिकाऱ्यांना निलंबित केले. पीएसआय दिलीप खरडे (PSI Dilip Kharde) व एपीआय लखन उईके अशी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत. या पूर्वी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिले होते. गोरेगाव येथे पीडित महिलेवर बलात्कार झाल्यानंतर पीडित महिला लाखनी पोलीस स्टेशनला आली होती. तिच्या तक्रारीकडं वेळेत लक्ष दिले असते, तर दुसरा झालेला बलात्कार टाळता आला असता, असा आरोप शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केला होता. यात लाखनी पोलिसांची अक्षम्य चूक समोर आली होती. लाखनी पोलिसांवर ( Lakhni Police) टीका होऊ लागली. त्यानंतर नव नियुक्त पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी हे प्रकरण अधिक गंभीर घेतले.
लाखनीत नेमकं काय घडलं
गोरेगाववरून चालकाने जंगलात पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर तिला सोडून दिलं. ती लाखनी पोलिसांत गेली. तिथं पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही. तिला ठाण्यात बसवून ठेवलं. त्यानंतर ती टॅक्सीनं ती कन्हाळगाव येथे गेली. धर्मा धाब्यासमोर टायर दुरुस्ती करणाऱ्या 22 वर्षीय युवकाकडं मदतीसाठी गेली. त्याने तिच्यावर बलात्कार केला. गर्भाशयात पेंचिस टाकल्याची माहिती आहे. शिवाय दुसऱ्या एका आरोपीनंही तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती. गावातील लोकांनी कारधा पोलिसांत नेलं. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. लाखनी पोलिसांनी ही बाब गांभीर्यानं घेतली नाही. त्यांनी पहिल्या आरोपीचा शोध घेतला असता, तर तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार झाला नसता. हा गंभीर गुन्हा असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी लाखनी पोलीस ठाण्यातील पीएसआय आणि एपीआयला निलंबित केलं.
खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी
भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी भंडारा भाजपाच्या महिला आघाडीने केली आहे. या मागणीला घेऊन भाजपा महिला आघाडीने मूक मोर्चा काढला. जिल्हा पोलीस अधीक्षकांना मागणीचे निवेदन दिले. पीडित महिलेवर गोंदिया व भंडारा दोन्ही जिल्ह्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला राष्ट्रीय महामार्गावर फेकून आरोपी फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. आणखी आरोपींच्या शोधत आहेत. या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी केली होती.