बहिणीने पळून लग्न केल्याचा राग, भावाने फसवून भेटायला बोलावले, नंतर थेट…
संबंधित 16 वर्षीय तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील विशुनपुरवा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील रहिवासी आहे. तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या घरच्यांना कळताच त्यांनी विरोध केला
पाटणा : बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहामध्ये (Bihar Crime News) बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासेल अशी घटना समोर आली आहे. बहिणीच्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरून भावाने तिला गंडक नदीत (Gandak River) फेकून पलायन केले. अल्पवयीन पीडितेला (Minor Girl) पाण्यात बुडताना पाहून आणि तिच्या किंकाळ्या ऐकून धान्हा पुलावर तैनात असलेल्या पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलीचा जीव वाचला.
काय आहे प्रकरण?
मुलीला उपचारासाठी मधुबनी पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 16 वर्षीय तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील विशुनपुरवा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील रहिवासी आहे. तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या घरच्यांना कळताच त्यांनी विरोध केला. मात्र एकमेकांच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या या प्रेमी युगुलाने गुपचूप लग्न केले. त्यानंतर ते बिहारला गेले.
याची माहिती मुलीचा भाऊ व्यास आणि कुटुंबीयांना कळताच त्यांचा पारा चढला. व्यासने आपल्या बहिणीची वहिनीशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने तिला घराबाहेर भेटायला बोलावले, तिथून तो तिला दिशाभूल करून उद्यानात घेऊन आला. या ठिकाणी तरुणाने बहिणीला गंडक नदीवरील गौतम बुद्ध सेतूवर नेऊन ढकलले. वरून पडल्याने मुलगी बेशुद्ध पडली.
जवानांच्या सतर्कतेने प्राण वाचले
काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरडा सुरू केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांनी पुलाच्या पलीकडे ड्युटीवर असलेल्या जवानांना माहिती दिली, त्यानंतर मुलीला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेबाबत मुलीने सांगितले की, तिच्या सख्ख्या भावाने तिला पाण्यात ढकलून मारण्याचा प्रयत्न केला आहे.
धानाचे पोलिस निरीक्षक शशी शेखर चौहान यांनी सांगितले की, पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे. सध्या मुलगी शॉकमध्ये असून जास्त काही सांगू शकत नाही. पोलिसांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात एसडीपीओ कैलाश प्रसाद यांनी सांगितले की, पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.