नवाब मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या, उच्च न्यायालयाचे निर्देश
विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या किडनी तपासणीचा अहवाल मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. यावर मुंबई सत्र न्यायालयाने आपला निर्णय देणार आहे. यामुळे मलिक यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार की कारागृहात रवानगी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे खरंच आजारी आहेत हे पटवून द्या, असे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मलिक यांनी ईडीने केलेल्या अटके विरोधात जामिनासाठी अर्ज केला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर तातडीच्या सुनावणीसाठी आलेल्या मलिक यांना कोर्टाने निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान मलिकांना कोणताही गंभीर आजार नसल्याचा दावा ईडीतर्फे करण्यात आला. त्याचबरोबर नवाब मलिकांची जामिनासाठीची याचिका फेटाळून लावण्याची मागणी ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी मुंबई हायकोर्टात सुनावणी दरम्यान केली. नवाब मलिकांच्या जामिनावरील सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीच्या सुनावणीत मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तिवाद करण्याचे वकिलांना कोर्टाने निर्देश दिले आहेत.
किडनी अहवालावर अद्याप निर्णय नाही
विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या किडनी तपासणीचा अहवाल मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. यावर मुंबई सत्र न्यायालयाने आपला निर्णय देणार आहे. यामुळे मलिक यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार की कारागृहात रवानगी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून अहवाल मागवण्यात आला होता. मलिक कुटुंबियांनी कोर्टात 3 नेफ्ट्रोलॉजिस्टची नावं सादर केली होती. यापैकी कोर्टानं निश्चित केलेल्या एका नेफ्ट्रोलॉजिस्ट मार्फत मलिक यांच्या किडनी संदर्भात अहवाल मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
मलिक यांच्यावरील आरोप काय?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे.
या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते.
मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.
नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. मात्र नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.