भाऊच बनला बहिणीचा दुश्मन…! लग्न ठरूनही तिला घरातून पळून करावा लागला विवाह
बहिणीचा साखरपुडा झाल्यानंतरही भाऊच तिचा वैरी बनल्याची घटना समोर आली आहे. बहिणीचं ठरलेलं लग्न मोडून दुसऱ्या व्यक्तीशी लावण्याचा भावाचा मनसुबा होता. त्यामागचं कारण म्हणजे...
जयपूर : घरच्यांच्या संमंतीने लग्न ठरलं, साखरपुडाही झाला, मात्र तरीही एका युवतीला घरातून पळून जाऊन वराशी (Fiance) लग्न करावं लागल्याची (Love marriage) घटना घडली आहे. तिच्या सख्ख्या भावामुळेच हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नासाठी त्या तरूणीचा भाऊच सख्ख्या बहिणीचा शत्रू झाला. मुलीच्या भावाने आता तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमक्या मिळाल्यानंतर पती-पत्नी हे संरक्षणासाठी एसपी कार्यालयात पोहोचले आहेत. राजस्थानमधील चुरू येथील ही घटना असून पूजा असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचलेल्या पूजा या तरुणीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न बरदास गावातील यद्रमशी (वय २४) ठरवलं होतं. साखरपुडा झाल्यावर ती भावी पतीशी फोनवर बोलायची. दोघांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या. पूजाने सांगितले की, ती तिच्या भावी पतीवर मनापासून प्रेम करू लागली होती. पण तिचा भाऊ या साखरपुड्यामुळे खुश नव्हता.
भावाचं लग्न होत नव्हतं
पूजाने सांगितले की तिचा भाऊ दारुड्या आहे. त्यामुळेच बऱ्याच काळापासून त्याचं लग्न ठरत नव्हतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याच्या भावाच्या लग्नासाठी एक स्थळ आलं होतं. पण त्यांनी एक अट घातली होती. भावाचं लग्न व्हायला हव असेल तर पूजाचं ठरलेलं लग्न मोडावं लागेल. आणि तिचं लग्नही भावाच्या होणाऱ्या सासरच्या घरातील युवकाशी लावावे लागेल. याला साटं-लोटं असं म्हणतात.
लग्न मोडण्यास पूजाने दिला नकार
मात्र पूजाला हे कळल्यावर तिने लग्न मोडण्यास साप नकार दिला. मात्र पूजाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न जबरदस्तीने दुसऱ्या घरात ठरवले. 11 जूनला तिला मुलगा बघायला येईल असे सांगण्यात आले. यानंतर पूजाने 10 जून रोजी तिचं घरं सोडलं आणि भावी पतीच्या घरी गेली. तेथून ते दोघे जोधपूरला गेले. तेथे 12 जून रोजी दोघांनी आर्य समाजात जाऊन विवाह केला.
मुलीच्या भावाने मेव्हण्याच्या आई-वडिलांना दिली धमकी
पूजाने घर सोडताच तिच्या भावाने तिचा पाठलाग करत तिचा शोध घेतला. मात्र तिचं लग्न झाल्याचं कळताच तिचा भाऊ तिच्या सासरी गेला व तिच्या सासरच्या लोकांना धमकी दिली. पूजा व तिचा पती यांना ठार करू अशी धमकी त्याने दिली. ही धमकी मिळाल्यानंतर पूजा आणि तिचा पती दोघेही पोलिसांत पोहोचले. आपल्या जीवाला धोका असून संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.