संशयाचे भूत मनात शिरले, भावानेच भावाला आयुष्यातून उठवले; कुठे घडली घटना?
चुलत भाऊ आपल्या पत्नीशी जवळीक साधत असल्याचा पतीला संशय होता. याच संशयातून तो भावाशी भांडलाही, मात्र संशयाचं भूत काही मनातून जात नव्हतं. अखेर त्याने टोकाचे पाऊन उचलले.
राजसमंद : भाऊ आपल्या पत्नीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संशयातून पतीने आपल्या लहान भावाची हत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्यासोबत न्याय मागण्याचे नाटक करत होता. या हत्या प्रकरणात त्याला त्याच्या भाच्याने मदत केली. पोलिसांनी कसून तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. या हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नरेंद्र रेगर आणि मुरली अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
रिक्षात रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता मृतदेह
ऑटोचालक मदनलाल रेगर याचा रक्ताने माखलेला मृतदेह शुक्रवारी रात्री सोनियाना गावाजवळ त्याच्या ऑटोमध्ये आढळून आला. धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली होती. तपासादरम्यान पोलिसांना मदनचा चुलत भाऊ नरेंद्रवर संशय आला. पोलिसांनी नरेंद्र रेगर याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला.
संशयातून भावानेच भावाचा काटा काढला
मदनलाल आपल्या पत्नीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. यावरून काही महिन्यांपूर्वी जोरदार वादावादी झाली होती. मात्र मदन आपल्या पत्नीच्या संपर्कात असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून मदनला मार्गातून दूर करण्यासाठी त्याला मारण्याची योजना आखली. पैशाचे आमिष दाखवून त्याने आपला दूरचा भाचा मुरली याला यात सहभागी करून घेतले. मुरली कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे पैशाच्या लोभापोटी तो हे करण्यास तयार झाला.
नरेंद्र घटनेच्या दिवसापासून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. घटनेच्या दिवशी मदन कारखान्यात कामावर गेला होता आणि तेथून रात्री जत्रा पाहण्यासाठीही गेला होता. यावेळी मुरलीने मागून हल्ला करुन त्याला संपवले. मुरलीने मदनलालला मारले तेव्हा नरेंद्रने त्याला पाच हजार रुपयेही दिले होते.