पुण्यात म्हाडाच्या पैशांचा गैर व्यवहार, बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
म्हाडाच्या पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
पुणे / अभिजीत पोते : म्हाडाच्या पैशांचा आर्थिक गैरव्यवहार करणे एका बांधकान व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिक कायद्याच्या कचाट्यात सापडला असून, त्याच्याविरोधात पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज प्रकाश येवला असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय शंकर ठाकूर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करत त्याची तुरुंगात रवानगी केली.
म्हाडाच्या पैशांचा गैरव्यवहार केला
बंडगार्डन पोलीस ठाण्याअंतर्गत म्हाडाच्या इमारतींचे बांधकाम सुरु होते. या बांधकामाचे कंत्राट बांधकाम व्यावसायिक पंकज येवला याच्या भूमी कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. यासाठी म्हाडाने त्याला आवश्यक आर्थिक पुरवठाही केला होता. मात्र या व्यावसायिकाने या पैशाचा गेरव्यवहार केला.
म्हाडाच्या घरांच्या बांधकामासाठी या पैशांचा वापर न करता आपल्या वैयक्तिक कामाकरीता केला. म्हाडाच्या लाभार्थ्यांना 31 मार्च 2022 पर्यंत घराचा ताबा देण्यात येणार होता. मात्र हे आश्वासन पाळले न गेल्याने लाभार्थी सदनिका धारक चांगलेच संतापले आणि त्यांनी उपोषणाचा इशारा म्हाडाला दिला.
व्यावसायिकाची येरवडा कारागृहात रवानगी
यानंतर म्हाडाने बांधकाम व्यावसायिकाची चौकशी केली असता सदर गैरव्यवहार उघडकीस आला. यानंतर म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय शंकर ठाकूर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पंकज येवला याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार बिल्डरला अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.