Buldhana Crime : रुग्ण तपासण्यासाठी डॉक्टरला घरी बोलावले, नंतर थेट … हादरलेल्या डॉक्टरची पोलिसांकडे धाव
रुग्णाला तपासण्याच्या बहाण्याने आधी डॉक्टरांना घरी बोलावले. मात्र त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुम्हीही हादराल. त्या डॉक्टरला थेट पोलिसांत धाव घ्यावी लागली पण का ?
गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 20 ऑक्टोबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे (crime in city) प्रमाण वाढले आहे. चोरी, लूटमार यासोबत खंडणीखोरांचाही उपद्रव वाढला आहे. अशाच काही खंडणीखोरांचा एका डॉक्टरला जबरा फटका बसला. रुग्ण तपासण्याच्या बहाण्याने डॉक्टरला घरी बोलावून नंतर त्याला ब्लॅकमेल (blackmailing a doctor) करत लाखोंची खंडणी मागितल्याचा प्रकार बुलढाणा शहरात घडल्याचे उघडकीस आले आहे.
डॉक्टरांविरोधात कट रचून त्याच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. दरोडा आणि खंडणी वसूल केल्याप्रकरणी बुलढाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली.
असा रचला कट
बुलढाण्यात राहणाऱ्या एका डॉक्टरसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. कॅन्सरच्या रुग्णाला घरी येऊन तपासण्याविषयी त्यांना विनंती करण्यात आली. त्यानुसार तो डॉक्टर त्या इसमासोबत त्याच्या घरी गेला. मात्र तेथे त्याच्यासोबत काय घडेल याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. घरी गेल्यानंतर त्या इसमाने धाक दाखवत डॉक्टरला मारहाण केली आणि त्याच्याकडे असलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्या डॉक्टराच्या मुलांना जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. आणि डॉक्टरला त्याचे कपडे काढायला लावून त्याचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी त्याच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच ॲडव्हान्स म्हणून त्याच्याकडून ब्बल साडेआठ लाख रुपयेही वसूल करण्यात आले.
यामुळे हादरलेल्या डॉक्टरने शेवटी कशीबशी हिंमत गोळा केली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तब्बल आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आठ जणांपैकी पाच जणांना अटक केली. तर इतर तीन आरोपी अद्याप परार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.