टॅक्सीत बसताच ड्रायव्हरची महिलेला मारहाण, मुलावरही केला हल्ला; पण का ?
मेट्रो सिटीमध्ये एका उबर ड्रायव्हरने महिला प्रवासी आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
बंगळुरू | 11 ऑगस्ट 2023 : एका उबर ड्रायव्हरने (taxi driver) त्याच्या टॅक्सीत बसलेली महिला प्रवासी आणि तिच्या मुलाला मारहाण (beat up passenger) केली असा आरोप लावण्यात आला आहे. बंगळुरूत ही घटना घडली असून सध्या पोलिसांनी आरोपी टॅक्सी ड्रायव्हरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील भोगनहल्ली भागात हा धक्कादायक प्रकार घडला. 48 वर्षीय महिला तिच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जात होती. त्यासाठी त्या महिलेच्या मुलीने एक कॅबही बूक केली. ही महिला घराबाहेर कॅबची वाट पहात असतानाच, तिला एक कॅब येताना दिसली. ती आपलीच टॅक्सी असल्याचे वाटून ती महिला तिच्या मुलासह टॅक्सीमध्ये बसली. मात्र आत बसताक्षणीच ही आपली कॅब नसल्याचे तिच्या लक्षात आल्याने ती खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता कॅब ड्रायव्हरने तिला मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले, की पीडित महिला अनावधानाने चुकीच्या कॅबमध्ये बसली व ते लक्षात आल्यावर तिने खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता ड्रायव्हरने तिला मारहाण केली. तसेच तिच्या मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या स्थानिक लोकांना हा प्रकार दिसताच त्यांनी हस्तक्षेप केला आणि मारहाण थांबली.
या महिलेद्वारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बंगळुरूमधील मल्लेश्वरम येथील मूळ निवासी असलेल्या 25 वर्षांच्या कॅब ड्रायव्हरला अटक केली. दरम्यान मारहाणीची ही संपूर्ण घटना तेथीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. पीडित महिलेच्या पतीने सोशल मीडियावर आपबीती शेअर केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यांनी उबरमध्ये देखील याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
सोशल मीडियावर शेअर केला धक्कादायक अनुभव
माझी पत्नी आमच्या मुलासह रुग्णालयात जाणार होती, त्यासाठी आम्ही उबरची कॅब बूक केली. 11 वाजून 5 मिनिटांनी कॅब घराजवळ पोहोचली. माझे कुटुंबिय कॅबमध्ये बसत असतानाच आपण चुकीच्या कॅबने जात आहोत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ड्रायव्हरला लगेच याबाबत सांगितले. त्यानंतर आमचा मुलगा कॅबमधूल खाली उतरला, पत्नी खाली उतरणार होती तोच ड्रायव्हरने अचानक कॅबचा वेग वाढवला. त्यादरम्यान त्याने अनेक वेळा माझ्या पत्नीच्या डोक्यावर वार केले. आमचा मुलगा तिला वाचवण्यासाठी गेला असता, ड्रायव्हरने त्याच्यावरही हल्ला करत मारहाण केली, अशा शब्दात पीडितेच्या पतीने भयानत अनुभव शेअर केला.
त्यानंतर शेजार-पाजारचे लोक त्यांच्या मदतीसाठी आले, तेव्हाही ड्रायव्हरचा गोंधळ सुरूच होता. अखेर पोलिसांना फोन केला असता तो (ड्रायव्हर) टॅक्सीमध्ये बसून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण आमच्या परिसरातील सुरक्षारक्षकांनी त्याला मेन गेटवरच रोखले, असेही त्यांनी लिहीले.