Chandrapur Crime : गुजरातमध्ये दारू तस्करीसाठी चंद्रपुरातून कारची चोरी, एका आरोपीला अटक, दुसरा फरार
गुजरातच्या आरोपीला दारुची वाहतूक करायची होती. त्यासाठी त्याने चोरीच्या गाड्या वापरायच्याहोत्या. दारुची तस्करी करण्यासाठी चोरीच्या गाड्या वापरण्याचा त्यांचा प्लान होता.
चंद्रपूर : दारूबंदी असलेल्या गुजरात (Gujarat) राज्यात दारू तस्करीसाठी चंद्रपूरातून कार चोरीची प्रकरणे उजेडात आली आहेत. चंद्रपूर शहरात दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी विविध भागातून चोरीला गेलेल्या 2 कारबाबत शोध अभियान राबवताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. गुजरातेतून चंद्रपुरात कार चोरीसाठी पोहोचलेल्या आरोपींची गाडीच गवसल्याने कट उजेडात आला. बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील रहिवासी कार मालक (Car Owner) सतनामसिंग बावरी याला ताब्यात घेत चौकशी केल्यावर त्याने मोडस ऑपरेंडी उघड केली. बावरी यानेच चंद्रपुरात लपवून ठेवलेल्या गाड्याची माहिती दिली. प्रकरणातील फरार असलेल्या लखनसिंग सरदार या गुजरात राज्यातील वडनगरच्या मास्टर माईंड आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींजवळून तीन लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याच गाड्यांचा वापर करून गुजरातेत दारू तस्करी केली जाणार होती. शहरातील तगड्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या सहाय्याने पोलिसांनी प्रकरणाचा शोध लावला.
एका आरोपीला अटक, दुसरा फरार
नेहरुनगर आणि पाराडाईस हॉटेलजवळून दोन चार चाकी गाड्या चोरी गेल्या. त्याची तक्रार रामनगर पोलिसांना 20 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. चोरी गेलेली गाडी ही बुद्धनगर येथे सापडली. त्यादरम्यान शोधमोहीम राबविली असता इतर दोन गाड्या सापडल्या. संबंधित आरोपीने गुन्हा कबुल केला. परंतु, त्याचा दुसरा सहकारी हा गुजरात येथील आहे. सरदार नावाचा आरोपी फरार झाला. पहिल्या आरोपीने चोरलेल्या गाड्या कुठं ठेवल्या याची माहिती पोलिसांना दिली. गुजरातच्या आरोपीला दारुची वाहतूक करायची होती. त्यासाठी त्याने चोरीच्या गाड्या वापरायच्या होत्या. दारुची तस्करी करण्यासाठी चोरीच्या गाड्या वापरण्याचा त्यांचा प्लान होता. तो चंद्रपूर पोलिसांनी धुळकावून लावला.