भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या कॅनेडियन महिलेची फसवणूक, वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कॅनडेडियन महिला भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी 5 वर्षापूर्वी भारतातील गोवा येथे आली होती. यादरम्यान आरोपी राकेश शर्माही गोव्यात होता. तेथे या दोघांची भेट झाली.
नवी मुंबई : जगभरात सर्वत्रच भारतीय संस्कृतीची भुरळ मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळेच परदेशी महिलांमध्ये भारतीय मुलांशी लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय मुलांशी लग्न करुन भारतात सेटल व्हायलाही परदेशी महिलांना (Foreign woman) आवडते. काही महिला भारतात कामानिमित्त किंवा अभ्यासानिमित्त येतात आणि येथेच सेटल होतात. मात्र भारतीय संस्कृतीच्या (Indian Culture) प्रेमात पडलेल्या कॅनेडियन महिलेची लग्नानंतर फसवणूक (Cheating to Canadian Woman) झाल्याची घटना नवी मुंबईतील वाशी येथे उघडकीस आली आहे.
वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कॅनेडियन महिलेच्या फसवणूक प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश शर्मा असे पतीचे तर निर्मला शर्मा असे सासूचे नाव आहे. तर इजाबेल ब्रिकोल्ड असे 46 वर्षीय पीडित कॅनेडियन महिलेचे नाव आहे.
घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल
नवी मुंबई वाशी सेक्टर 15 येथे राहणाऱ्या इजाबेल ब्रिकोल्ड या कॅनडियन महिलेने घरगुती हिंसाचार आणि फसवणूक प्रकरणी पती आणि सासू विरोधात तक्रार केली आहे. या महिलेने भारतीय संस्कृतीला आपलं समजून भारतीय पुरुषाशी 5 वर्षापूर्वी लग्न केले होते.
काळ्या जादूची धमकी देत घरात कैद केले
लग्नाआधी पतीने आपण प्रसिद्ध सिनेअभिनेते असल्याचे महिलेला सांगितले होते. लग्नानंतर पती आणि सासूला कॅनडाला घेऊन जाण्यास नकार दिल्याने तिला सतत त्रास दिला जात होता. तसेच 2018 पासून काळी जादू करण्याची धमकी देत महिलेला घरामध्ये कैद करण्यात आले होते.
महिलेच्या स्टे व्हिजा प्रक्रियेतही अडथळे निर्माण केल्याचा महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात पती राकेश शर्मा आणि सासू निर्मला शर्मा यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोव्यात अभ्यासासाठी आली असती दोघांची भेट
कॅनडेडियन महिला भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी 5 वर्षापूर्वी भारतातील गोवा येथे आली होती. यादरम्यान आरोपी राकेश शर्माही गोव्यात होता. तेथे या दोघांची भेट झाली. यावेळी राकेशने आपण सिने अभिनेता असल्याचे महिलेला सांगितले.
अभ्यासादरम्यान इजाबेल आणि राकेशच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांच्यात मैत्री झाली. मग या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि दोघे राकेशच्या वाशी येथील घरी रहायला लागले. मात्र लग्नानंतर राकेश आणि त्याच्या आईकडून इजाबेलला त्रास होऊ लागला.