बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने तिघा रेल्वे अधिकाऱ्याने केली अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
ओदिशा रेल्वे अपघाताप्रकरणात सीबीआयने अखेर शुक्रवारी तिघा रेल्वे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1100 प्रवासी जखमी झाले होते.
नवी दिल्ली : दोन दशकातील सर्वात मोठा रेल्वे अपघात म्हणून ओळखला जाणाऱ्या ओदिशा रेल्वे ( Balasore Train Accident ) अपघात प्रकरणात सीबीआयने ( CBI ) अखेर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तिघा रेल्वे अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या रेल्वे अपघातात 292 जणांचा मृत्यू तर 1100 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात काही हेतुपुरस्सरपणे सिग्नलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगमध्ये छेडछाड केल्याचा संशय होता. त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या शिफारसीवरुन हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ओदिशा रेल्वे अपघाताप्रकरणात सीबीआयने शुक्रवारी तिघा रेल्वे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या वरिष्ठ इंजिनिअर अरुण कुमार महंत, सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार या तिघांना अटक करण्यात आली आहे. ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यात बहनगा रेल्वे स्थानकाजवळ 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात कोरोमंडळ एक्सप्रेसची लूप लाईनवर उभ्या असलेल्या एका मालगाडीला धडक दिली होती. त्यानंतर या कोरोमंडळ एक्सप्रेसच्या डब्यांना धडकून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या यशवंतपूर एक्सप्रेसचेही डबे रुळांवरुन घसरले होते. यात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1100 प्रवासी जखमी झाले होते.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
या तिघा अधिकाऱ्यांना आयपीसी कलम 304 ( सदोष मनुष्यवध ) आणि 201 (गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. अटक केलेल्या आरोपीची सीबीआय चौकशी करणार आहे. सिग्नलिंग मेंटनरने एक रीकनेक्शन मेमो जारी केला होता. याचा अर्थ देखभालीचे काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिग्नलिंग सिस्टम लाईव्ह होता. ट्रेनला जाण्याची परवानगी देण्यापूर्वी सिग्नलिंग प्रणालीचे परीक्षण करण्याच्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले गेले नव्हते असे रेल्वे बोर्डाच्या सूत्रांनी इंडीयन एक्सप्रेसला सांगितले आहे.