Hingoli Child Rescued : औंरगाबादमधून अपहरण झालेल्या चिमुकल्याची हिंगोलीत सुटका, आरोपीला पोलिसांकडून अटक
आरोपीला फुलउबरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर सुटका करण्यात आलेल्या चिमुकल्याला काकांच्या स्वाधीन केले. आरोपीने मुलाचे अपहरण कशासाठी केले होते, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

हिंगोली : आई वडिलांची नजर चुकवून औंरगाबाद जिल्ह्यातील फुलउबरी येथून 24 तारखेला अपहरण (Kidnapping) करण्यात आलेल्या सहा वर्षीय बालकाची हिंगोलीत सुटका (Rescued) करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला औंढा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. दिनेश कुलकर्णी असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला फुलउबरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर सुटका करण्यात आलेल्या चिमुकल्याला काकांच्या स्वाधीन केले. आरोपीने मुलाचे अपहरण कशासाठी केले होते, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. अंधश्रद्धेतून हा गुन्हा असावा असा पोलिसांना संशय आहे. तपासाअंतीच खरे कारण उघड होईल.
भक्त निवास संचालकाच्या सतर्कतेमुळे चिमुकल्याची सुटका
आरोपीने औरंगाबादमधील फुलउबरी येथून चिमुकल्याचे अपहरण केले. त्यानंतर आरोपी चिमुकल्याला घेऊन विविध ठिकाणी फिरला. आज दुपारच्या सुमारास आरोपी दिनेश कुलकर्णी हा हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील श्रीकृपा भक्त निवास येथे आला. त्याने एक रुम बुक केली. मात्र भक्त निवास संचालकाला त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी तात्काळ औंढा नागनाथ पोलिसांशी संपर्क साधला. औंढा पोलीस तात्काळ भक्त निवासात दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची कसून चोकशी केली असता आरोपीने अपहरण केल्याची कबुली दिली.
चिमुकल्याला सुखरुप कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले
पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यांना त्या गाडीत विषारी औषध आढळून आले. आरोपीने मोबाईलमध्ये आत्महत्या कशी करायची याचेही व्हिडिओ पाहिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. औंढानागनाथ पोलिसांनी फुलउबरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. चिमुकल्याच्या कुटुंबाला माहिती मिळताच त्याचे काका तिथे हजर झाले. चिमुकल्याला सुखरूप औंढा पोलिसांनी काकांच्या स्वाधीन केले तर आरोपी दिनेश कुलर्णीला फुलउबरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास आता फुलउबरी पोलिस करत आहेत. मात्र अपहरण का केले हे समजू शकले नाही. आरोपी पोशाखाने महाराज असल्याने उद्या आमवस्या आहे. त्यामुळे हा अंधश्रद्धेचा प्रकार तर नाही ना ..? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Child kidnapped from Aurangabad rescued in Hingoli, accused arrested by police)