साडी व्यापाऱ्यांचं धक्कादायक कृत्य, आर्थिक कारणातून नागरिकाचे अपहरण आणि हल्ला
पारंपरिक व्यवसायून मार्केटमध्ये आपला ब्रँड तयार करणाऱ्या साडी व्यापाऱ्यांनी धक्कादायक कृत्य केले आहे. या कृत्यामुळे त्यांना आता जेलची हवा खावी लगणार आहे.
ठाणे : साडी विक्रीच्या व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवून ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नावारूपाला आलेले ठाण्यातील दोन व्यवसायिक कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. या दोन व्यावसायिकांनी आर्थिक कारणावरून मुलुंड येथील एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन फारिया आणि रसिक बोरिचा अशी आरोपी व्यावसायिकांची नावे असून या दोघांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. ठाणे शहरातील साडीच्या मार्केटमध्ये सावी आणि रांगोळी नावाच्या साडीच्या ब्रँडची महिला ग्राहकांना वेगळीच भुरळ आहे. याच ब्रँड्सच्या मालकांनी केलेल्या गुन्हेगारी कृत्यामुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यातील व्यापारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आरोपी नितीन फारिया आणि रसिक बोरिचा या व्यावसायिकांची ठाणे पश्चिमेकडील परिसरात साडी विक्रीची मोठी दुकाने आहेत. पारंपारिक व्यवसायामुळे साडी विक्रीच्या मार्केटमध्ये त्यांचा ब्रँड तयार झाला आहे. फारिया आणि बोरिचा या दोघांनी कोरम मॉलच्या परिसरातून मुलुंड येथील रहिवाशाचे अपहरण केले. तेथून त्या व्यक्तीला येऊर बंगला परिसरात नेण्यात आले. त्यानंतर त्याला वैयक्तिक भांडणातून बेदम मारहाण केली.
दोघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मुलुंडच्या रहिवाशाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. बिपीन कारिया असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वर्तकनगर पोलिसांनी दोन्ही साडी व्यवसायिकांविरोधात भारतीय दंड विधानच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
रांगोळी साडीचे मालक रसिक बोरीचा आणि सावी साडी शोरूमचे मालक नितीन कारिया यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कलम 364 अ, 365, 506 (2), 364 ए, आणि शांतता भंग करण्याच्या हेतूने (कलम 504) स्वेच्छेने गंभीर दुखापत (कलम 325) याअंतर्गत विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.