Video : कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारा ट्रक नागरिकांनी पेटविला, परिसरात पोलिसांचं पथक तैनात
ट्रक सापडल्यानंतर नागरिकांनी तो पेटवून दिला आहे. त्यामुळे पोलिस सुध्दा एकदम अलर्ट झाले आहेत. त्या ट्रकचा मालक कोण आहे. त्याचबरोबर इतक्या गायी कुठून आणल्या होत्या. त्या कुठपर्यंत पोहोचवल्या जाणार होत्या इत्यादी माहिती पोलिस सध्या शोधत आहेत.
बुलढाणा – बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील नांदुरा (Nandura) येथे रात्री एक ट्रक कत्तलींसाठी गाई घेऊन जाताना दिसला. त्यानंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी संबंधित ट्रकातील गाई बाहेर काढल्या अन् ट्रक पेटवून दिला. मंगळवारी तिथं काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याठिकाणी पोलिसांनी (Police) पथकं तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संबंधित ट्रकमध्ये 25 गाई होत्या. त्यापैकी 17 जीवंत आहेत. गाडीचा चालक फरार झाला असून पोलिस त्याचा तपास करीत आहेत.
नेमकं काय घडलं
मुंबईच्या दिशेने 25 गाई घेऊ जाणारा ट्रक नांदुरा शहरात बिघाड झाल्याने एका ठिकाणी थांबला होता. मात्र त्यातील गाईंचा ओरडण्याचा आवाज नागरिकांना आला असता. नागरिकांनी ट्रकची पाहणी केली. त्यावेळी 25 गाई कोंबून चालवल्या असल्याचे लोकांच्या निर्दशनास आले. त्यानंतर चिडलेल्या नागरिकांनी त्यातील गायींना तात्काळ बाहेर काढले. त्यावेळी आतमध्ये 8 गाईंचा मृत्यू झालेला होता. तर 17 गाई जिवंत होत्या. नागरिकाचा संताप पाहून ट्रक चालक आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले आहेत. मात्र नागरिकांच्या मनात संताप असल्याने त्यांनी तो ट्रक पेटवला. यावेळी शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पथकं तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. चालक आणि त्याच्या साथीदारवर गुन्हा दखल केला आहे.
पोलिस आरोपीच्या शोधात
ट्रक सापडल्यानंतर नागरिकांनी तो पेटवून दिला आहे. त्यामुळे पोलिस सुध्दा एकदम अलर्ट झाले आहेत. त्या ट्रकचा मालक कोण आहे. त्याचबरोबर इतक्या गायी कुठून आणल्या होत्या. त्या कुठपर्यंत पोहोचवल्या जाणार होत्या इत्यादी माहिती पोलिस सध्या शोधत आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे आठ गाईंचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
अनेकदा अशा घटनांमध्ये महाराष्ट्रात चालकाला बेदम मारहाण केली आहे. काल चालक पळून गेल्यामुळे संतप्त जमावाने ट्रक पेटविला.