दत्तक मुलीवर एवढा राग का? अत्याचार पाहून अंगाचा थरकाप उडेल, कुठे घडली ही संतापजनक घटना?
आधी मुलीला दत्तक घेतले. मग पालकांनी सात वर्षाच्या दत्तक मुलीसोबत जे केले ते पाहून काळजाचा थरकाप उडेल. निष्पाप मुलीची यात काय चूक होती की पालकांनी तिच्यासोबत एवढे अमानुष कृत्य केले.
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सात वर्षाच्या निष्पाप मुलीसोबत जे घडले ते ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. मुलीसोबत ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने दत्तक घेतलेल्या मुलीसोबत अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलीचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. अंजना सिन्हा आणि अरुण कुमार सिन्हा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलीचे आई-वडिल या जगात नाहीत. यामुळे या मुलीला या दाम्पत्याने दत्तक घेतले होते.
पीडित मुलगी मूळची कानपूरची आहे. तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर कुणीतरी तिला लखनऊ येथे आणले. तेथून या दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. धुमणगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रीतम नगरमध्ये सनशाईन अपार्टमेंटमध्ये हे जोडपे 4 महिन्यांपूर्वी या मुलीसोबत रहायला आले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी आरोपी महिलेने मुलगी दत्तक घेतली होती. मात्र आरोपी महिला मुलीला मोलकरणीप्रमाणे घरातील कामे करायला लावत असे. मुलीकडून काही चूक झाली तर ती तिचा खूप छळ करायची. शनिवारी मुलीचा हात मोडल्याने महिला तिला रुग्णालयात घेऊन गेली. खेळताना मुलीचा हात मोडल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले. मात्र मुलीची अवस्था पाहून डॉक्टरांना संशय आला.
डॉक्टरांना मुलीच्या शरीरावर ओरखडे आणि भाजल्याच्या खुणा दिसल्या. तसेच मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड आढळले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत पुढील तपास सुरु केला. तपासानंतर जे समोर आलं ते ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.
महिलेने कुकर आणि इस्त्रीने मुलीला भाजल्याचा आरोप आहे. मुलीचा हात पिरगळून मोडला. महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड टाकले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे. आरोपी महिलेचा पती अरुण सिन्हा हा कॅन्टोन्मेंटच्या आर्मी स्कूलमध्ये शिक्षक आहे.
हे दाम्पत्य या मुलीला आपल्या नातेवाईकाची मुलगी म्हणून सांगायचे आणि दत्तक घेण्याबाबत बोलायचे. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर छावणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.