Crime | अल्पवयीन मुलीचे अपहरण, दोन महिन्यांपासून फरार, मात्र एका चुकीमुळे खेळ खल्लास, उल्हासनगर पोलिसांनी करुन दाखवलं
उल्हासनगरातून दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. येथील पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव याला या प्रकारणात अटक केलं आहे. हा आरोपी मुलीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून फरार होता.
ठाणे : उल्हासनगरातून (Ulhasnagar) दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. येथील पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव याला या प्रकारणात अटक केलं आहे. हा आरोपी मुलीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून फरार होता. मात्र त्याला गुजारतमधून (Gujrat) अटक करण्यात आले. दोन महिन्यांपासून कोणताही थांगपत्ता न लागू देणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला त्याच्या फक्त एका चुकीनंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सध्या मुलीची सुखरुपपणे सुटका करण्यात आली असून ‘अंडापाव’ या सराईत गुन्हेगाराची पोलीस चौकशी करत आहेत. आरोपीने अल्पवयीन मुलीला गुजरातमध्ये का नेले ? उल्हासनगरात मानवी तस्करीसंदर्भातील (Human Trafficking) एखादे रॅकेट सक्रिय आहे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस या आरोपीकडून मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दोन महिन्यांपासून पोलीस घेत होते शोध
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलं होतं. याच परिसरातील सराईत गुन्हेगार संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव यानं या मुलीचं अपहरण केलं होतं. यानंतर पोलीस अंडापाव याचा आणि अपहृत मुलीचा शोध घेत होते. मात्र अंडापाव यानं आपला फोन बंद करून ठेवला असल्यानं पोलिसांना त्याचा माग काढता येत नव्हता. पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे अंडापावचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र तब्बल दोन महिन्यांनी या आरोपीने एक चूक केली. त्याच्या याच चुकीचा फायदा उचलत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
एक चूक केली, अन् पोलिसांनी बेड्या ठोकल्या
अंडापाव यानं काही दिवसांपूर्वी उल्हासनगरातील त्याच्या मित्रांशी संपर्क साधला होता. पण मागील दोन महिन्यांपासून पोलीस अंडापावच्या मित्रांच्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवून होते. अंडापावच्या मित्रांना गुजरातमधून कॉल येत असल्याचा पोलिसांना सुगावा लागला. पोलिसांनी गुजरातमधील त्या नंबरचा माग काढून थेट गुजरात गाठले. तर तिथे अंडापाव हा त्या मुलीसह आढळून आला. यानंतर या मुलीची सुटका करून तसंच अंडापाव याला अटक करून उल्हासनगरात आणण्यात आलं. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सध्या मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.
मुलीला पालकांकडे सोपवले
दरम्यान, अंडापाव विरोधात याप्रकरणी बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वी त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दंगल, खुनाचा प्रयत्न, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे. तर दुसरीकडे आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.
इतर बातम्या :