फेसबुकवरील मैत्री महागात, नगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याची 2 लाख 30 हजारांना फसवणूक
अहमदनगरला कर्जत तालुक्यातील राशीन येथे एका सरकारी कर्मचाऱ्याला फेसबुकवरील मैत्री महागात पडली आहे. शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैशांचा फंडा सांगून राशीनच्या सरकारी कर्मचाऱ्याला गंडा घालण्यात आला.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीन येथे एका सरकारी कर्मचाऱ्याला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली. या अधिकाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
अहमदनगरला कर्जत तालुक्यातील राशीन येथे एका सरकारी कर्मचाऱ्याला फेसबुकवरील मैत्री महागात पडली आहे. शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैशांचा फंडा सांगून राशीनच्या सरकारी कर्मचाऱ्याला गंडा घालण्यात आला. त्याची तब्बल 2 लाख 30 हजार रुपयांना फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
राहुलकुमार श्रीधर राऊत असं या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना राहुल नामदेव कवाडे याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. नंतर विश्वास संपादन करून व्हॉट्सअॅपवर तर कधी फोनवर बोलणे सुरू झाले. नंतर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याची विनंती केली.
लाखो रुपयांची गुंतवणूक महागात
आरोपी राहुल कवाडेच्या विनंतीला प्रतिसाद देत राहुलकुमार श्रीधर राऊत यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली अन् तिथेच घात झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ
फेसबुकवरील मैत्रीतून आर्थिक फसवणूक होण्याचे अनेक प्रकार समोर आलेले पाहायला मिळतात. कधी गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने कस्टम अधिकाऱ्याच्या नावाखाली पैसे उकळले जातात, तर कधी ओटीपी विचारण्याच्या बहाण्याने पैसे काढले जातात. कधी महागड्या वस्तू मिळवण्याच्या आमिषाने आर्थिक लुबाडणूक केली जाते. तर कधी फेसबुक अकाऊण्ट हॅक करुन मित्र असल्याचे भासवून पैसे उकळले जातात. अशा सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात असून फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याच्या सूचनाही केल्या जातात.
संबंधित बातम्या :
मशिनमध्ये स्कार्फ अडकला, पुण्यात 21 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू
बायकोचा डावा हात निकामी, CISF जवान पतीने सुपारी देऊन जीवच घेतला