अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार
व्हिडीओ कॉलवर एक महिला अश्लील कृत्य करत होती, काय होत आहे हे लक्षात येताच त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला, त्यानंतरही आपल्याला त्या नंबरवरून वारंवार कॉल येत होते, असं सुर्वे म्हणाले.
मुंबई : व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून राजकीय नेत्याला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी दहिसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुर्वे हे मुंबईतील मागाठणे विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप प्रकाश सुर्वेंनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
आमदार प्रकाश सुर्वे यांना 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नमस्ते असा व्हॉट्सअॅप मेसेज आला. एका अज्ञात क्रमांकावरुन सुर्वेंना हा मेसेज आला होता, परंतु सुरुवातीला प्रकाश सुर्वे यांनी उत्तर दिले नाही.
16 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास प्रकाश सुर्वे यांना त्याच नंबरवरून आणखी एक व्हॉट्सअॅप मेसेज आला, ज्यामध्ये ‘नमस्कार काय झाले? असे विचारण्यात आले होते.
प्रकाश सुर्वे यांना व्हिडीओ कॉल
काही वेळातच प्रकाश सुर्वे यांना व्हिडीओ कॉल आला. प्रकाश सुर्वे यांनी पोलिसांना सांगितले की, सुरुवातीला आपण फोन उचलला नाही, मात्र दुसऱ्यांदा फोन आल्यावर एखादी व्यक्ती अडचणीत असेल, असा विचार करुन त्यांनी फोन उचलला.
व्हिडीओ कॉलवर एक महिला अश्लील कृत्य करत होती, काय होत आहे हे लक्षात येताच त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला, त्यानंतरही आपल्याला त्या नंबरवरून वारंवार कॉल येत होते, असं सुर्वे म्हणाले.
दहिसर पोलिसात तक्रार
यानंतर सुर्वे यांनी मला फोन करू नका अन्यथा पोलिसात तक्रार करू, असे सांगितले. या प्रकरणी दहिसर पोलीस अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.