लखनऊ : कवी संदीप खरे यांची एक खूप सुंदर कविता आहे. या कवितेत ‘तिने कवितेमधून दंश टाकला होता, मी अमृत मानून प्राशन केलं’, असे काहीसे बोल आहेत. अर्थात त्या कवितेचा संदर्भ वेगळा आहे. पण उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने चहामध्ये विष टाकून संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर पाच जणांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेवर संपूर्ण बहराईच जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच आरोपी महिला स्वत:च्या कुटुंबियांशी इतकं निर्घृण आणि निष्ठूरपणे कसं वागू शकते? असा सवाल काही जणांकडून उपस्थित केला जातोय.
बहराईचमध्ये राहणाऱ्या पंचम जयस्वाल यांच्या घरी थोरली सून अंकिता नुकतीच एक महिन्यांनी सासरी आली होती. घरात उत्साहाचं वातावरण होतं. सकाळी सर्वजण उठल्यानंतर थोरली सून अंकिताने चहा बनवला. पण तिने या चहामध्ये विष टाकलं. हा चहा पिणाऱ्या घरातील इतर सदस्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यांनी आनंदाने चहा पिला. अर्थात आपल्यासोबत असं काही घडेल, अशी कल्पनादेखील त्यांना नव्हती. पण चहा प्यायल्यानंतर थोड्यावेळात अंकिताचे सासरे, दीर, दीराची मुलगी, नणंद, नणंदचा दीड वर्षांचा मुलगा यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान दीड वर्षांचा चिमुकला रुंद्राश याचा मृत्यू झाला. तर इतरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेच्या दीराचा जबाब नोंदवला. यावेळी दीराने अंकिताने केलेली चहा प्यायल्यानंतर सर्वजण आजारी पडले, अशी माहिती दिली. याशिवाय सर्वांच्या मेडीकल रिपोर्टमध्येही शरीरात विष गेल्याची माहिती होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपी अंकिताची चौकशी केली. यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केला. पती आणि सासरच्या मंडळींकडून सुटका मिळावी यासाठी आपण हे कृत्य केलं, असा कबुली जबाब अंकिताने पोलिसांना दिला.
पोलिसांनी आरोपी अंकिताला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीअंती पोलिसांनी आरोपी महिलेचं विवाहबाह्य संबंध असल्याची शक्यता वर्तवली आहे. पण त्यावर पोलिसांनी ठाम असं मत मांडलेलं नाही. पोलीस या प्रकरणाता पुढील तपास करत आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
बॉयफ्रेंड घरात असताना पती घरी आला, नंतर हाहा:कार, दुसऱ्या दिवशी नाल्यात मृतदेह