अंत्यसंस्काराला उपस्थित राहिली म्हणून संताप अनावर झाला, मग कुटुंबीयांनी आईवर हल्ला करत मुलीला…
सात दिवसापूर्वी कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला. मायलेकी काही कारणास्तव अंत्यसंस्काराला गेल्या नाहीत. यामुळे नातेवाईक संतापले अन् पुढे भयंकर घडलं.
मुंबई : अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्या नाहीत म्हणून मायलेकीवर नातेवाईकांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उशिरा घाटकोपरमध्ये घडली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला, तर आई जखमी झाली आहे. काजल भोसले उर्फ काजल पवार असे मयत मुलीचे, तर वैशाली पवार असे जखमी आईचे नाव आहे. जखमी वैशाली पवार यांनी देवनार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी देवनार पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. कृष्णा पवार, अनिशा पवार, जगमित्रा पवार आणि अनिता पवार अशी अटक आरोपींची नावे आहेत.
अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याने हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात दिवसांपूर्वी एका आरोपीच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी दोघी मायलेकी काही कारणास्तव गेल्या नव्हत्या. यामुळे आरोपी जोडप्यांच्या मनात राग खदखदत होता. याच रागातून त्या मंगळवारी रात्री काजलच्या घरी आल्या. यावेळी काजल आणि तिची आई वैशाली घरी बसल्या होत्या. आरोपींनी काजलला अंत्यसंस्कारासाठी न आल्याबद्दल जाब विचारला. यावरुन त्यांच्यात वाद झाला.
लहान मुलगी घरी आल्यानंतर घटना उघड
वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी काजलच्या डोक्यात दगडाने वार केले. मग तिच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केले. मुलीला वाचवण्यासाठी काजलची आई मध्ये पडली असता त्यांच्यावरही आरोपींनी वार केले. यानंतर काजल बेशुद्धावस्थेत पडलेली बघून आरोपींनी तेथून पळ काढला. वैशालीची धाकटी मुलगी घरात आली तेव्हा आई आणि बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. तिने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केले.
चार आरोपींना अटक
आई जिवंत होती, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. यानंतर वैशाली पवार यांनी देवनार पोलीस ठाण्यात मुलीच्या हत्येसंदर्भात तक्रार दिली. वैशाली यांच्या तक्रारीवरुन देवनार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करत, चारही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि दगडही पोलिसांनी जप्त केला आहे.