नकार दिला म्हणून तरूणीवर चाकूने केले वार, नंतर स्वत:लाही संपवलं… राजधानी पुन्हा हादरली
दिल्लीतील बेगमपूर भागात एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीने महिलेवर चाकूने वार करून नंतर आत्महत्या केली.
दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून तरूणीवर हल्ला (women stabbed) झाल्याची घटना घडली आहे. बेगमपूर भागात एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीने महिलेवर चाकूने वार करून नंतर आत्महत्या केली. जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अमित असे त्या आरोपीचे नाव होते.
शुक्रवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अमितने महिलेवर चाकूने वार केल्याची घटना घडली. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला, त्यानंतर लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले.
दरम्यान, अमितने घटनास्थळावरून पळ काढला आणि नंतर त्याच्या कार्यालयात आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
साक्षी मर्डर केस
दिल्लीतील रोहिणी येथील शाहबाद डेअरी परिसरात साक्षी नावाच्या अल्पवयीन मुलीची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच दिल्लीत पुन्हा अशीच घटना घडली आहे. साक्षी या 16 वर्षीय मुलीवर 20 हून अधिक वेळा चाकूने वार करून तिची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी साहिलला पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली.
साक्षीने त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतल्याने साहिल संतापला होता त्यामुळे त्याने हे निर्घृण कृत्य केले. ते दोघे 2021 पासून डेट करत होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी साहिलची कसून चौकशी केली व त्याच्या सांगण्यावरून रिठाळा परिसरातून गुन्ह्याचे हत्यारही जप्त करण्यात आले.