अजून एकाने केली ‘लिव्ह इन’ पार्टनरची हत्या! आफताबप्रमाणेच तोही तिचे तुकडे करणार होता?
राजधानी दिल्लीतून आणखी एक खळबळजनक घटना समोर! रेखा आणि मनप्रीम लिव्हमध्ये राहत होते, पण...
दिल्ली : श्रद्धा हत्याकांड नंतर आता दिल्लीतून आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. दिल्लीतच आणखी एका लिव्ह ईन पार्टनरने त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेची हत्या केली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी पंजाबमधून अटक केलीय. धक्कादायक बाब म्हणजे आफताब पुनावाला प्रमाणेच आरोपी त्याच्या लिव्ह ईन पार्टनरचे तुकडे करण्याच्या इराद्यात होता, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. पण त्याआधीच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. याप्रकरणी सध्या अधिक तपास केला जातो आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, 35 वर्षांची एक महिला लिव्ह ईनमध्ये आपल्या 16 वर्षीय मुलीला घेऊन राहत होती. या महिलेचं नाव रेखा रानी असल्याचं कळतंय. तिचा मृतदेह गणेश नगर, दिल्ली येथील घरात आढळून आला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
रेखाच्या शरीरावर आणि तिच्या जबड्यावर गंभीर स्वरुपाचे घाव घालण्यात आले होते. रेखाचा लिव्ह इन पार्टनर मनप्रीत यानेच तिची हत्या केली असून त्याला अटक करण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. 2015 सालापासून मनप्रीत आणि रेखा एकत्र राहत होते.
मनप्रीतचं आधीच लग्न झालं होतं. त्याला दोन मुलं देखील होती. तर रेखा राणी हिला एक मुलगी होती. ते रेखा आणि मनप्रीत हे रेखाच्या मुलीसह लिव्ह ईनमध्ये राहू लागले होते. गणेश नगर भागात राहत असताना अचानक मनप्रीतने रेखाच्या हत्येच्या कट आखला.
मनप्रीत याने 1 डिसेंबर रोजी रेखाच्या मुलीला झोपेच्या गोळ्या गुपचूप घाऊ घातल्या. ती गाढ झोपी गेली आहे, हे पाहून त्याने रेखा राणी हिची हत्या केली. मनप्रीत याने आफताब पुनावालप्रमाणेच रेखाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी चाकूही आणला होता. पण रेखाच्या मुलीमुळे आपण अडकले जाऊ शकतो, यासाठी घाबरुन त्याने पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनप्रीत याच्यावर हत्या आणि अपहरणाचेही गुन्हे दाखल आहेत. आता याप्रकरणी पोलिसांनी कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला असून रेखाच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पुढील तपास केला जातो आहे.