आधी खांबाला बांधलं, मग लाठ्या-काठ्यांनी इतकं मारलं की जीवच गेला, त्या तरूणाचा काय गुन्हा होता ?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये त्या तरूणाला बेदम मारहाण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तो तरूण व्हिवळत होता, सोडून देण्याची विनंती करत होता, मात्र त्याचे कोणीच ऐकले नाही.
नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणाला खांबाा बांधून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार राजधानीतील नंदनगरी भागात घडला. गैरसमजातून काही युवकांनी त्याला खांबाला बांधले आणि शिवीगाळ करत बेदम चोप (youth beaten up) दिला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. त्या युवकाच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. युवकाला खांबाला बांधून मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून पोलिस मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.
साधासुधा तरूण का अडकला ? तिथे नेमकं काय घडलं ?
नंदनगरी येथे भाजी विकणारे अब्दुल यांनी पोलिसांना सांगितले की, मंगळवारी त्यांचा २६ वर्षीय मुलगा इसार हा पहाटे पाचच्या सुमारास घरातून सुंदरनगरीच्या दिशेने निघाला होता. तो जी-4 ब्लॉकजवळ पोहोचला तेव्हा काही मुलांनी त्याचा रस्ता अडवत चौकशी सुरू केली. ते त्याला चोर समजले आणि त्यांनी लगेचच त्याला खांबाला घट्ट बांधून लाठ्या-काठ्यांनी बेदम चोप द्यायला सुरूवात केली. संध्याकाळी जेव्हा त्याचे वडील घरी पोहोचले तेव्हा त्यांना त्यांचा तरूण मुलगा घरासमोर , रक्तबंबाळ झालेला जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर जखमा झाल्या होत्या.
लाठ्या -काठ्यांनी केली पिटाई
इसारने त्याच्या वडिलांना सांगितले की, त्याला सुंदर नगरीजवळ जी-4 ब्लॉक येथे काही मुलांनी थांबवले. आणि खांबाला बांधून मारले. ते त्याला चोर समजत होते. या मारहाणीनंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. इसारने काही मुलांची ओळख पटवत, त्यांची नावं वडिलांना सांगितली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आमिरने त्याला रिक्षात बसवून घरी आणल्याचेही त्याने नमूद केले. मात्र यानंतर अवघ्या तासभरातच इसरचा दुर्दैवी मृत्यू झाला. पित्यासमोरच त्याने अखेरचा श्वास घेतला.
या घटनेबद्दल नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
व्हिडीओ झाला व्हायरल
त्या तरूणाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो तरूण खांबाला बांधलेल्या अवस्थेत दिसत असून काही तरूण त्याच्यावर काठ्यांचा प्रहार करत आहेत. पीडित युवक वारंवार त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, सोडून देण्याची विनंती करत होता. मात्र त्या तरूणांनी त्याचे काहीही न ऐकता त्याला निर्घृणपणे चोप दिला.