डीजे बंद करायला सांगितले म्हणून शेजारी भडकला, मग गर्भवती महिलेसोबत जे घडले ते भयंकर !
नवीन बाळासाठी कुआ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठमोठ्याने डीजे वाजत होता. रात्री उशिरापर्यंत डीजे सुरु असल्याने गर्भवती महिलेला याचा त्रास होत होता. यामुळे तिने डीजे बंद करायला सांगितले. यानंतर भयंकर घटना घडली.
दिल्ली : उत्तर पश्चिम दिल्लीतील सिरसपूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डीजे बंद करायला सांगितले म्हणून शेजाऱ्याने थेट महिलेवर गोळी झाडल्याची घटना रविवारी रात्री सव्वा बारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत महिलेच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला असून, महिलेची प्रकृती गंभीर आहे. महिलेवर शालीमार बागेतील मॅक्स रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार सुरु आहेत. महिलेच्या गळ्याला गोळी लागल्याने ती चिंताजनक आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित महिलेच्या शेजारी कुआ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळाच्या जन्मानंतर करण्यात येणारा हा एक विधी आहे. कार्यक्रमात रात्री 12 वाजले तरी मोठमोठ्याने डीजे वाजत होता. यामुळे गर्भवती रंजू नामक महिलेला या आवाजाचा त्रास होत होता. अखेर तिने शेजारी हरिशला डीजे बंद करायला सांगितले. यामुळे हरिशला राग आला आणि त्याने मित्राची बंदूक घेऊन रंजूवर गोळी झाडली.
ही गोळी रंजूच्या गळ्याला लागली. यात ती गंभीर जखमी झाली. रंजूला घरच्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र या घटनेमुळे तिचा गर्भपात झाला असून, तिची प्रकृती गंभीर आहे. मंजूला आधीच तीन मुलं आहेत.
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हरिश आणि त्याला बंदुक देणाऱ्या त्याच्या मित्राला तात्काळ अटक केली आहे. दोन्ही आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो, तर त्याचा मित्र मोबाईल रिपेरिंगचे काम करतो.