सर्जरी स्कॅम ; MBBS डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी करायची ऑपरेशन, रुग्णांच्या जीवाशी खेळ !
राजधानी दिल्लीतील सर्जरी स्कॅममध्ये आणखी एका डॉक्टरचा सहभाग समोर आला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. आरोपी डॉक्टर नीरज अग्रवाल हा त्याच्या पत्नीकडून ऑपरेशन करून घेत असल्याचेही समोर आले आहे, तिच्याकडे कोणतीही मेडिकल डिग्री नव्हती. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : दिल्ली पोलिसांनी ग्रेटर कैलास येथून दोन डॉक्टर आणि दोन बनावट डॉक्टरांना अटक केली आहे. त्यांच्या दवाखान्यात कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळ केला जात होता , बरीच गडबड सुरू होती असे समोर आले आहे. या क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियेनंतर 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या चार आरोपींसोबत फरिदाबादमधील आणखी एका डॉक्टरचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याच रुग्णालयात हा डॉक्टर लोकांवर शस्त्रक्रियाही करत होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी अनेकांना अटक केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितल्याचे एका वृतसंस्थेने नमूद केले आहे. राजधानी दिल्लीच्या पॉश भागात असलेल्या ग्रेटर कैलाशमध्ये असलेल्या अग्रवाल मेडिकल सेंटरमध्ये हा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. ऑक्टोबर महिन्यात या क्लिनिकमध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी चार डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.
डॉ. नीरज अग्रवाल, त्याची पत्नी पूजा अग्रवाल, डॉ. जसप्रीत आणि ओटी तंत्रज्ञ महेंद्र अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.रिपोर्ट्सनुसार, नीरज आणि जसप्रीत हे स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत. मात्र पूजा आणि महेंद्र हे बनावट डॉक्टर असल्याचे दाखवून लोकांवर शस्त्रक्रिया करत होते. डॉक्टर नीरज हे त्यांच्या पत्नीकडून ऑपरेशनसाठी मदत घ्यायचे, मात्र तिच्याकडे कोणतीही मेडिकल डिग्री नवह्ती. तर आरोपी महेंद्र हा याच नर्सिंग होममध्ये गॉल ब्लॅडरची समस्या असलेल्या रुग्णांचेऑपरेशन करत असे.
निष्काळजीपणामुळे अनेकांनी गमावला जीव
या लोकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एका 45 वर्षीय रुग्णाचा मृत् झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर, हे प्रकरण संशयास्पद असल्याचे डॉक्टरांना वाटले. कारण वर्षभरापूर्वी, 2022 सालीही याच नर्सिंग होममध्ये एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. प्रसूती वेदनांमुळे तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी प्रसूती न करताच शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी लावला होता.
सफदरजंग रुग्णालयातही केले काम
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. नीरज अग्रवाल यांचे हे अग्रवाल मेडिकल सेंटरआहे. नीरजने यापूर्वी सफदरजंग रुग्णालयात काम केले. काही वर्षे डॉक्टर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी हे नर्सिंग होम उघडले. ज्यामध्ये त्याची पत्नी पूजा अग्रवाल ही रिसेप्शनिस्ट आणि नर्सिंग स्टाफ म्हणून काम करत होती. तर महेंद्रने या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन टेक्निशियन म्हणूनही काम केले. या तिघांनी या रुग्णालयात सर्जन असलेल्या डॉ. जसप्रीत यांचे लेटरहेडही ठेवले होते.
त्या नर्सिंग होममध्ये कोणताही रुग्ण आलाय्वर त्याला थेट ऑपरेशन करण्यास सांगितलं जायचं. डॉक्टर जसप्रीत यांच्या नावाने प्रिस्क्रिप्शन तयार करण्यात यायचे तर, तंत्रज्ञ महेंद्र हा ऑपरेशन करायचा. या चौघांच्या फसवेगिरीमुळे आणि बेपर्वाईमुळे ऑपरेशननंतर अनेकांनी त्यांचा जीव गमावला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.