Dombivli Crime : झटपट पैसा कमावण्याचा मोह नडला, इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवून 17 लाखांना लुबाडलं..
झटपट पैसा कमावण्याचा मोह अनेकांना असतो. त्यासाठी ते काहीही मार्ग अवलंबण्याच्याही तयारीत असतात. मात्र अशा पद्धतीने पैसा मिळणं दूरच राहतं, उलट फसवणूक होऊन पैसे गमवावे लागण्याची शक्यताच अधिक असते
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 3 फेब्रुवारी 2024 : झटपट पैसा कमावण्याचा मोह अनेकांना असतो. त्यासाठी ते काहीही मार्ग अवलंबण्याच्याही तयारीत असतात. मात्र अशा पद्धतीने पैसा मिळणं दूरच राहतं, उलट फसवणूक होऊन पैसे गमवावे लागण्याची शक्यताच अधिक असते. असाच काहीसा दुर्दैवी प्रकार डोंबिवलीतही घडला असून त्यामुळे एका तरूणाला तब्बल 17 लाखांचा फटका बसला आहे. गुंतवणुकीवर झटपट 40 टक्क्याचे परतावा मिळेल असे आमिष दाखवून लूट केली. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरूणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून त्याला आमच्या ऑनलाईन योजनेत तत्काळ गुंतवणूक केली तर तुम्हाला 20 ते 40 टक्के तात्काळ परतावा मिळेल, असे अमिष भामट्यांनी दाखविले. या अमिषाला भुलून मागील महिन्याभरात या तरूणाने टप्प्याने एकूण 17 लाख 33 हजार रूपये भामट्यांच्या योजनेत भरले केले. पण सांगितलेल्या वेळेत आकर्षक परतावा न दिल्याने भामट्यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार आल्हाद अनिल रानडे याने रामनगर पोलिस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फिर्यादी आल्हाद हा संगणक तंत्रज्ञ असून तो रामनगरमधील राजाजी रोड परिसरात राहतो. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आल्हाद याला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आला. तुम्हाला अर्धवेळ नोकरी करायची असेल तर आपण संपर्क करू शकता, असे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. आल्हाद याने त्या मेसेजला प्रत्युत्तर देऊन कामाबाबत विचारणा केली. त्यावेळी समोरून रितू नावाच्या महिलेने आम्ही तुम्हाला दिलेल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा, तुम्हाला तात्काळ 210 रूपये मिळतील, असे सांगितले. त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर आल्हाद याला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही लिंक्स आल्या. त्या आल्हाद याने भरून दिल्या. त्यात आल्हाद याच्या बँक खात्यांची माहितीही भरून घेण्यात आली होती.
आकर्षक परताव्याचे आश्वासन
त्यानंतर इन्स्टाग्रामच्या 147 सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये आल्हादला ॲड करण्यात आले. ग्रुपचे ॲडमीन कपील सिंग आणि एमिली सिंग यांनी आता तुम्ही जेवढी रक्कम गुंतवाल त्या रकमेचे गुगल मॅप, पंचतारांकित हॉटेलला रेटिंग द्याल तेवढ्या बदल्यात तुम्हाला 20 ते 40 टक्के केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा तात्काळ मिळेल, असे आश्वासन आल्हादला दिले. त्यानंतर इतर सदस्य आल्हाद याला ग्रुपमधून गुंतवणुकीतून आकर्षक परतावा तात्काळ मिळत असल्याचे दाखवून देत होते. आल्हादलाही त्याचा अनुभव आला.
कमी कालावधीत वाढीव परताव्याची रक्कम मिळत असल्याने आल्हादने एचडीएफसी, ॲक्सिस, आयसीआयसीआय, फेडरल, पंजाब नॅशनल अशा 5 बँक खात्यामधून 20 हजार ते 40 हजार रूपये टप्प्याने मागील महिनाभराच्या कालावधीत भामट्यांच्या सूचनेप्रमाणे गुंतवले. एकूण 17 लाख 33 हजार रूपये भरल्यानंतर आरोपी कपील आणि एमिली हे दोघे आल्हादला संरक्षित रक्कम, रक्कम परतावा व कर तपासणी नावाखाली पैसे भरण्यास सांगत होते. एवढी रक्कम आपणाकडे नाही असे आल्हाद याने कळविताच आरोपींनी बँक खात्यामधील रक्कम आल्हाद याच्या खात्यात पाठवली. त्या पैशांचा वापर करून आल्हादने आरोपींनी दिलेल्या प्रक्रिया पूर्ण केल्या.
आता आपली रक्कम परत मिळाली पाहिजे या प्रयत्नात आल्हाद होता. पण रक्कम परत हवी असेल तर आणखी रक्कम भरा, असा आग्रह कपील आणि एमिली यांनी धरला. ही रक्कम भरली नाहीत तर तुमची रक्कम परत मिळणार नाही, असे सांगून त्या भामट्यांनी आल्हादला रिप्लाय देणं बंद केलं. एवढंच नव्हे तर त्याला व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही बाहेर काढले. या प्रकारामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे आल्हादच्या लक्षात आले आणि त्याने रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.