Dombivli Crime : केडीएमसी कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या चौघांना अटक, घाटकोपरमधून आवळल्या मुसक्या
महापालिकेचे कर्मचारी तथा वाहनचालक विनोद लंकेश्री याच्यावर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हे चारही आरोपी घाटकोपरमधील असून व्यवसायाने रिक्षाचालक आहेत.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 2 डिसेंबर 2023 : डोंबिवली सध्या एकामागोमाग एक घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे हादरली आहे. काही दिवसांपूर्वी एका अज्ञात चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवत जिओ गॅलरीतून आयफोन पळवण्याचा प्रयत्न केला होता. तर दुसरीकडे डोंबिवली महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामुळे डोंबिवलीत दहशतीचं वातावरण पसरलं होतं.
दरम्यान महापालिकेचे कर्मचारी तथा वाहनचालक विनोद लंकेश्री याच्यावर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हे चारही आरोपी घाटकोपरमधील असून व्यवसायाने रिक्षाचालक असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. कमरुद्दीन शेख, अरबाज सय्यद, इस्त्राईल शहा आणि शाहरुख शेख अशी या हल्लेखोरांची नावे आहेत. मात्र विनोद लकेश्री याच्यावर हा हल्ला कशासाठी आणि कुणाच्या इशाऱ्यावरून केला ? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण ? याचा तपास रामनगर पोलिसांकडून सुरू आहे.
भररस्त्यात रात्री हल्ला करून हल्लेखोर पसार
विनोद लंकेश्री हा डोंबिवली महानगरपालिकेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी तथा वाहनतालक आहे. गेल्या महिन्यात 27 तारखेला रात्री 8 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील शहीद भगतसिंग रस्त्यावर विनोद लंकेश्री याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विनोद हा गंभीर जखमी झाला. चाकूने हल्ला करुन हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. हे पाहताच रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्या काही हाती लागला नाही.
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी भादवी 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर पोलिसांनी कसून तपास करत हा हल्ला करणाऱ्यासह चौघांना अटक केली. हे चौघे मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे आहेत. कमरुद्दीन शेख, अरबाज सय्यद, इस्त्राईल शहा आणि शाहरुख शेख अशी या हल्लेखोरांची नावे आहेत. मात्र विनोद यांच्यावर हा हल्ला कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरुन केला गेला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या हल्ल्यामागे कोणी तथा कथित बिल्डर, फेरीवाल्यांचा नेता की केडीएमसीतील कोणी शुक्राचार्य आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.विशेष म्हणजे या गुन्हेगारांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.