सांगलीची गाढवं चीनला हवीहवीशी, कशी पोहोचली सांगलीची गाढवं चीनमध्ये…
रक्तस्त्राव, चक्कर, निद्रानाश, कोरडा खोकला आणि महिलांमधील गर्भाशयाच्या आजारावर औषध तयार करण्यासाठी गाढवांच्या कातडीचा वापर केला जातो. उत्तेजना वाढविण्यासाठीही गाढवाचे मांस फायद्याचे असल्याचे सांगितले जात आहे.
शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : आतापर्यंत अंमली पदार्थ, दारु, गुटखा, गाय यांची तस्करी केल्याच्या बातम्या आतापर्यंत आपण ऐकत होतो. मात्र सांगलीतून चक्क गाढवांची तस्करी (Smuggling of Donkeys) होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातून गाढवांची चोरी करून त्याची चीनमध्ये तस्करी (Smuggle in China) केली जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. चीनमध्ये औषध निर्मित्ती, उत्तेजना वाढविण्यासाठी याचा वापर केला जातो. या तस्करीबाबत मोठे ‘रॅकेट’ सक्रिय (Smuggling Racket) असण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी गाढव तस्करी करणाऱ्या चौघांवर कारवाई केली आहे.
आंध्र प्रदेश आणि हैदराबाद तस्करीचे मुख्य केंद्र
आंध्र प्रदेश आणि हैदराबाद हे तस्करीचे मुख्य केंद्र आहे. औषध निर्मिती आणि उत्तेजना वाढवण्यासाठी गाढवांचा वापर केला जात आहे. नुकतेच सांगली महापालिका परिसरातून गाढवे चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात सांगली शहर पोलिसांना यश आलं आहे.
गाढव तस्करांकडून 9 गाढवं जप्त
सांगली, मिरजेसह जिल्ह्यातून गाढवांची चोरी करून त्याची चीनमध्ये तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे. गाढव तस्करांकडून नऊ गाढवे आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
तस्करी प्रकरणी चौघांवर अटकेची कारवाई
या प्रकरणी चार जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील अन्य साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोलापूर जिल्हा कर्नाटक राज्यात रवाना झाले आहे.
पुणे आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गाढवं येतात
पुणे आणि गुजरातमध्ये गाढवांचा मोठा बाजार भरतो. तेथूनच प्रामुख्याने गाढवे सांगली जिल्ह्यात येतात. पूर्वी जिल्ह्यात सुमारे 15 ते 20 हजार गाढवांची संख्या होती. आज हा आकडा आता चार हजारांपर्यंत गेला आहे.
चीनमध्ये लाखो रुपयांत विक्री
तस्करी हेच मुख्य कारण असल्याने गाढवांची संख्या कमी झाली आहे. येथून गाढव चोरी करून थेट चीनमध्ये लाखो रुपये किमतीला गाढवांची विक्री केली जात आहे. मात्र, गाढवांची चोरी होऊ लागल्याने गाढव मालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
या कारणासाठी होते गाढवांची तस्करी
गाढवीचे दूध लहान मुलांसाठी गुणकारी औषध मानले जाते. दररोज दोन चमचा या प्रमाणात तीन दिवसांसाठी दूध देण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये घेतले जातात. रक्तस्त्राव, चक्कर, निद्रानाश, कोरडा खोकला आणि महिलांमधील गर्भाशयाच्या आजारावर औषध तयार करण्यासाठी गाढवांच्या कातडीचा वापर केला जातो. उत्तेजना वाढविण्यासाठीही गाढवाचे मांस फायद्याचे असल्याचे सांगितले जात आहे.