नाशिक हादरलं, आंबेडकरवाडीत दोन सख्ख्या भावांचा खून, एक अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष
नाशिक शहरात मागच्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या, राडे अशा घटना सातत्याने घडत आहेत. आता पुन्हा एकदा नाशिक हत्येच्या घटनेमुळे हादरलं आहे. नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे.

नाशिकला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. नाशिक उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी येथे दोन सख्ख्या भावांचा खून झाला आहे. उमेश ऊर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. उमेश ऊर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक शहरात काल दिवसभर रंगपंचमीचा उत्साह होता. मोठ्या उत्साहात शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडी भागात या दोन हत्या झाल्या.
दोन बंधुंची हत्या करून हल्लेखोर फरार झाले आहेत. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरू झाला आहे. नाशिक शहरात मागच्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या, राडे अशा घटना सातत्याने घडत आहेत.
कशी हत्या झाली?
कोयता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोरच जाधव बंधुंवर भीषण हल्ला केला. अनेक वार अंगावर झाल्याने दोघे बंधु तिथेच रक्ताच्या थारोळ्या कोसळले. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधुंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी तपसाल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
राजकीय वैमनस्यातून हत्या का?
आंबेडकरवाडी परिसरात काल रात्रीच्या सुमारास हा गुन्हा घडला. मृत पावलेल्या दोघांपैकी एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहरउपाध्यक्ष आहे. या हत्यांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तुकड्या रवाना झाल्या आहेत. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली की, आणखी काही कारण यामागे आहे, ते लवकरच स्पष्ट होईल. नाशिकमध्ये अलीकडे गुन्हेगारी वाढली आहे.