पॉश कपडे घालून लग्नात व-हाडी बनून आले, लाखोंचे दागिने आणि आहेर घेऊन पळाले
लग्नाच्या भर मंडपातून वधूचे दागिने आणि आहेर चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. हे चोरटे पॉश कपडे घालून लग्नात व-हाडी बनून आले होते, सीसीटीव्हीची मदतीने त्यांचा शोध सुरू आहे.
मुंबई : एका भर लग्न समारंभातून दोघा चोरट्यांनी वधूचे लाखो रूपयांचे दागिने आणि आहेराची रोकड पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघा चोरट्यांनी या लग्न समारंभात एकदम पॉश कपडे घालून हजेरी लावल्याने कोणालाही संशय आला नाही. परंतू सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या मदतीने पोलीस आता त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असे पोलीसांनी म्हटले आहे.
सध्या लग्नाचा सिझन असून लग्नाच्या हॉलमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे लग्नसराईच्या या मोसमात सर्वांनीच काळजी घ्यावी अशी घटना उघडकीस आली आहे. बोरीवली पश्चिमेकडील न्यू लिंक रोडजवळील दुर्गा गार्डन येथे लग्न सोहळा सुरू असताना ही घटना घडली आहे. अमृता रामदास वरणकर आणि सुयश प्रकाश कोडारे यांचा विवाह सुरू असताना ही घटना घडली आहे. वधूच्या पित्याने तिच्या मेकरूममध्ये सोन्याचे दागिने आणि आहेराची रोकड ठेवली होती.
आरोपींनी वधूच्या पालकांच्या हालचालींवर नजर ठेवली होती. तेथून वधूचे पालक निघून जाताच दोघापैकी एकाने तेथे प्रवेश मिळवत दरवाजा उघडून दागिने आणि कॅश चोरून तो पसार झाला. चोरी झालेल्या दागिण्यात चाळीस हजार रूपयांचे कानातील दागिण्याची जोडी आणि पन्नास हजार रूपयांची रोकड याचा समावेश आहे.
आरोपींनी चांगला पेहराव केला होता. ते एकमेकांना वधूच्या पालकांच्या हालचाली विषयी सूचना देताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. त्यांच्या पैकी एकाने वधूच्या मेकअप रूममध्ये प्रवेश केला, दागिने आणि आहेराची पाकीटे घेऊन आला. तर दुसरा कोपऱ्यावर कोणी येत तर नाही याची पाळत ठेवून होता अशी माहीती उघड झाल्याचे पोलीसांनी सांगितले.
तक्रारदार मोहीत शेवाळे यांनी मिडडे या दैनिकाला सांगितले की लग्न मंडपातून दोघा जणांनी मौल्यवान दागिने लंपास केले आहेत. आम्ही एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ज्यावेळी कुटुंबिय जेवायला गेले त्याचवेळी आरोपींनी डाव साधत ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहेत, आम्ही अज्ञात आरोपी विरोधात केस दाखल केली आहे असे पोलीसांनी म्हटले आहे.