समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
समृद्धी महामार्गावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खाली कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर वाहक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमरावती / सुरेंद्रकुमार आकोडे : राज्याच्या विकासाला सुस्साट वेग मिळाल्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात असलेला समृद्धी महामार्ग प्रत्यक्षात वाहतुकीच्या दृष्टीने मात्र असुरक्षित ठरत आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताने या महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. भरधाव वेगातील ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक 15 फूट खाली कोसळला. अपघात एवढा भीषण होता की ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या महामार्गावर वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात
तारेने भरलेला हा ट्रक नागपूरवरून मुंबईकडे जात असताना सकाळी 6 वाजता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेदुरजना खुर्द दरम्यान हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट समृध्दी महामार्गाच्या पुलावरून 15 फूट खाली असलेल्या रस्त्यावर कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहक गंभीर जखमी झाला.
आशिष तिवारी असे मयत चालकाचे नाव आहे, तर संतोष केवट असे गंभीर जखमी वाहकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तातडीने त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.