मोबाईलवर व्हिडिओ पाहत होती चिमुरडी, अचानक मोठा आवाज आला अन्…
तिसरीत शिकणारी मुलगी रात्री घरात मोबाईलवर व्हि़डिओ पाहत होती. मात्र अचानक मोठा आवाज झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
त्रिशूर : केरळमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. मोबाईलचा स्फोट झाल्याने एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना त्रिशूर जिल्ह्यात घडली आहे. मुलगी मोबाईलवर व्हिडिओ पाहत होती. यावेळी मोबाईलचा स्फोट झाला आणि तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्रिशूर जिल्ह्यातील थिरुविलावमाला भागात ही धक्क्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तुम्ही तुमच्या पाल्यांना मोबाईल देत असाल तर या घटनेचा नक्की विचार करा.
मुलगी रात्री झोपून व्हिडिओ पाहत होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोबाईलवर व्हिडिओ पाहत होती. त्यावेळी मोबाईलमध्ये स्फोट झाला. मुलगी थिरुविलावमाला येथील न्यू लाईफ स्कूलमध्ये शिकत होती आणि तिसरी इयत्तेची विद्यार्थिनी होती. हा सेकंड हँड मोबाईल आम्ही तीन वर्षांपूर्वी विकत घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. हा फोन कोणत्या कंपनीचा होता, याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही.
फॉरेन्सिक टीमकडून तपास
अपघातानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घरी पोहोचली आणि तपास केला. मुलीच्या वडिलांचे नाव अशोक कुमार आहे, ते पझायनूर ब्लॉक पंचायतीचे माजी सदस्य आहेत. तर सौम्या असे मुलीच्या आईचे नाव आहे. याप्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पाढायन्नूर पोलिसांनी सांगितले.
यापूर्वीही घडली होती अशीच घटना
याआधीही मोबाईल स्फोटाची घटना घडली होती. फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशातील उज्जैन येथील बडनगर तहसील परिसरात मोबाईल फोन चार्ज होत असताना त्याचा स्फोट झाला. यात एका 60 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. स्फोट इतका मोठा होता की वृद्धाच्या शरीराचे अनेक तुकडे झाले. तो मोबाईल ओप्पो कंपनीचा होता.