बँकेत पैसे भरायला आलेल्या ग्राहकांना लुटून पसार व्हायचे, चोरट्यांची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीस चक्रावले !
बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मदत करण्याचे आवाहन करत बोलण्यात गुंतवून लुटायचे. अखेर गड्डी गँगचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे.
मीरा-भाईंदर : बँकेत पैसे जमा करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गंडा घालणाऱ्या गड्डी गँगचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या युनिटने ही कारवाई केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. मुश्ताक अहमद शेख, विशाल रमेश राज आणि प्रदिप पारसनाथ दुबे अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीचे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सदर घटना गांभीर्याने घेत वरिष्ठांनी सदर गुन्हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली.
काय आहे गड्डी टोळीची मोडस ऑपरेंडी?
बँकेत पैसे जमा करायला आलेल्या ग्राहकांकडे पैसे भरण्यासाठी मदत मागायचे. आपल्याकडील रक्कम त्यांच्याकडे भरण्यासाठी पुढे करत त्यांच्याकडील आपल्याकडे घ्यायचे. मग त्यांना बोलण्यात गुंतवून पसार व्हायचे. विरारमधील दिपक कुशवाह ही व्यक्ती विरार पश्चिमेकडील पंजाब नॅशनल बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी त्यांचीही अशा प्रकारे फसवणूक केली. कुशवाह यांना बोलण्यात गुंतवून 76 हजार रुपयांची रक्कम घेऊन आरोपींनी पोबारा केला.
कुशवाह यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 21 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींविरोधात मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय आणि पालघर येथे 10 हून गुन्हे दाखल आहेत.