काजूच्या बागेला लागलेली आग विझवायला गेले, मात्र स्वतःच होरपळले !
कष्टाने उभी केलेली काजूची बाग वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र हा प्रयत्नच त्यांच्यावर जीवावर बेतल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. जंगल परिसरात गवत पूर्णपणे सुकून गेल्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळवणे मुश्किल झाले होते.
रत्नागिरी / कृष्णकांत साळगावकर (प्रतिनिधी) : काजू बागेत लागलेल्या वणव्यामध्ये शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडीत दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गोविंद विश्राम घवाळी असे होरपळून मृत्यू झालेल्या 65 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली. तापमानात सातत्याने होत असलेली यामुळे वणवा लागण्याचे प्रमाण वाढत आहे.
सातत्याने तापमानात वाढ होत असल्याने वणव्याची घटना
कोकणसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सूर्य जणू आग ओकत आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने सगळीकडे रखरखाट जाणवत आहे. त्यातच जंगलांना वणवे लागण्याचे प्रकार घडत आहेत. अशाच प्रकारे हातखंबा येथे काजूच्या बागेला वणवा लागला. अवघ्या काही वेळातत या वणव्याने रौद्र रुप धारण केले.
काजूची बाग वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला
हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी 65 वर्षीय गोविंद घवाळी यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. कष्टाने उभी केलेली काजूची बाग वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र हा प्रयत्नच त्यांच्यावर जीवावर बेतल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. जंगल परिसरात गवत पूर्णपणे सुकून गेल्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळवणे मुश्किल झाले होते.
घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी आगीत होरपळलेले गोविंद यांची जीवघेणी तडफड सुरु होती. ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा अपयशी प्रयत्न केला. पण उपचार करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. माळरानावरील गवत हेच मुक्या जनावरांचे वैरण असते. हे वैरण वाचवण्यासाठी गोविंद यांनी निष्फळ प्रयत्न केले आणि जीवाला मुकले.