महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात भिवंडीतील दोन्ही डॉक्टर बहिणींचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
डॉक्टरांचं कुटुंब हे सर्व मिळून देवदर्शनासाठी जात होते. मात्र मंदिरात पोहोचण्याआधीच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोन बहिणींचा मृत्यू झाला. कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून त्यावरूनच अपघाताची भीषणता समोर येत आहे.

महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात देवदर्शनासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे झालेल्या या अपघातात डॉ.तन्वी आचार्य (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या डॉ.नीलम पंडित (55) यांनी रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. उज्जैनला जात असताना रविवारी सकाळी गुना-शिवपुरी या मार्गावर हा अपघात झाला. तर आणखी चौघे जणा गंभीर जखमी आहेत. डॉ. उदय जोशी (64),डॉ. सीमा जोशी (59) दोघे रा.दादर,डॉ.सुबोध पंडित (62) रा.वसई, डॉ.अतुल आचार्य (55) रा. भिवंडी अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टर अतुल आचार्य यांच्या पत्नी आणि मेहुणीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून वैद्यकीय वर्तुळातही दुःखाचे वातावरण आहे.
मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार,हे सर्व डॉक्टर कुटुंबीय महाराष्ट्रातून कारने तीर्थयात्रा करण्यासाठी गेले होते. अयोध्या येथील दर्शनानंतर हे सर्व कारने उज्जैन येथील महाकालेश्वर दर्शनासाठी निघाले होते. पण या प्रवासादरम्यान मध्य प्रदेश येथील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस पोलिस ठाणे क्षेत्रातील लुकवासा चौकी अंतर्गत गुना शिवपुरी या महामार्गावर भरधाव कार अनियंत्रित झाल्याने कार पुलाला ठोकर मारून नजीकच्या खड्ड्यात कोसळली. पुढल्या मंदिरात जाण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि दोघींनी जीव गमवावा लागला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की या अपघातामध्ये दोन महिला डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे हे वृत्त आणि दोन बहिणींचा मृत्यू यामुळे भिवंडीत हळहळ व्यक्त होत आहे.