शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली गंडा, अधिक फायदा मिळवून देतो सांगत तरुणाला लुटले
काही दिवसातच कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आल्याने त्याने पाठविलेली रक्कम परत मागण्यासाठी संपर्क साधला. परंतु, उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने अखेर राजेशने कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
भंडारा : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून अधिक फायद्याचे आमिष देत भंडारा तालुक्यातील आंबाडी येथील एका तरुणाला 1 लाख 92 हजार रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंकिता सिंग आणि निखिल शर्मा अशी दोन आरोपींची नावे आहेत.
तरुणाने डिमॅट अकाऊंट उघडले होते
राजेश हंसराज वंजारी असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी डीमॅट खाते उघडले होते. त्यानंतर त्याला अंकिता सिंग हिने फोन करुन शेअर मार्केटमध्ये अधिक फायदा करून देण्याचे सांगत बंगरुळ येथील एका कंपनीची मेम्बरशिप घेण्यास तयार केले.
अधिक फायदा मिळवून देतो सांगत पैसे उकळले
आरोपी निखिल शर्मा याने राजेशला अधिकाधिक फायदा करून देतो, असे सांगून राजेशवर दबाव आणून त्याच्या बँक खात्यातून ‘गुगल पे’च्या माध्यमातून 1 लाख 92 हजार 500 रुपये घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाची पोलिसात धाव
काही दिवसातच कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आल्याने त्याने पाठविलेली रक्कम परत मागण्यासाठी संपर्क साधला. परंतु, उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने अखेर राजेशने कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अंकिता सिंग आणि निखिल शर्मा या दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.