Video : करायला गेला एक, झालं भलतंच! ‘हा’ हेअर कट करणं पडलं भारी, नुसती आग आग
केस कापायला जाताय? जरा थांबा, आधी हा व्हिडीओ आणि ही बातमी वाचाच!
गुजरात : केस कापायला तुम्ही लोकल सलूनमध्ये (Saloon) जात असाल आणि तिथे जाऊन जर जगावेगळे प्रयोग करण्याच्या इराद्यात असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. गुजरातमध्ये (Gujrat News) एक धक्कादायक प्रकार घडला. एक तरुण फायर हेअर कट (Fire Hair Cut) करायला गेला. साधारण सलूनमध्ये फायर कट करणं, या तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं. या तरुणाच्या केसांना केस कापणाऱ्याने आग तर लावलीच. पण त्यानंतर या तरुणाची झालेली अवस्था आणि त्याची तडफड अंगावर काटा आणणारी होती. हा सगळा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
18 वर्षांच्या एक तरुणाला फायर हेअरकट करण्याची इच्छा होती. पण हा हेअरकट करताना आलेल्या अनुभवाने त्यांना चांगलाच धडा शिकवला. या तरुणाच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी शहरात हा प्रकार घडला.
फायर हेअरकट सध्या फार पॉप्युलर आहे. फायर हेअरकटची तरुणांनी क्रेझही पाहायला मिळते. पण अनुभवी आणि प्रशिक्षित हेअर ड्रेसरकडून फायर हेअरकट करुन घेणंही तितकंच गरजेचं असल्याचं गुजरातमधील घटनेनं अधोरेखित केलंय.
पाहा व्हिडीओ :
18-year-old boy suffered severe burn injuries after his ”fire haircut” went wrong at a salon in Vapi town of Gujarat’s Valsad district#valsad #fire_haircut #ViralVideo #viralvideos2022 pic.twitter.com/qZr8sXwQF1
— Ashish Sinha (@Ashish_sinhaa) October 27, 2022
बुधवारी ही घटना घडकीस आली. केसांना क्रीम लावून एक तरुण केस कापण्याच्या खुर्चीत बसला होता. त्यानंतर हेअर ड्रेसर माचिसची काडी पेटवताना दिसतो. काडीने पटकन केसांना पेटवतो. यानंतर केस कापायला बसलेल्या तरुणाच्या डोक्याची आग-आग होता. तरुण कासावीस होऊन थेट जागेवरुन उठतो आणि सैरावैरा पळू लागतो.
सध्या या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वलसाडच्या जिल्हा रुग्णालयात या तरुणाला दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. केसांना लागलेल्या आगीचं कारण केमिकल असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी सध्या सलून चालक आणि तरुणाकडूनही माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत. वलसाड पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास केला जातोय. तपासाअंती नेमकी कारवाई काय करायली, हे निश्चित केलं जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र या घटनेनं फायर हेअरकट करु इच्छिणाऱ्यांच्या पोटात गोळा आणला असणार, हे नक्की!