घरी लग्नाच्या विधी सुरु होत्या, महिलांची जेवणाची सुरु होती; तितक्यात सिलेंडरचा स्फोट झाला अन्…
लग्नाचे जेवण बनवत असताना स्वयंपाकघरात सिलेंडरचा स्फोट होऊन 12 जण जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील पाच महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भिंड : लग्नाचे जेवण सुरु असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच घरातील पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना मध्य प्रदेशातील भिंड येथे घडली. या घटनेत नवरदेवाची आई, काकी, वहिनी आणि दोन बहिणींचा मृत्यू झाला. ऐन लग्नाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. जलदेवी, नीरु, पिंकी, अनिता आणि सुनीता अशी स्फोटात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. लग्नाची वरात निघण्याआधीच लग्नघरातून पाच जणांची अंत्ययात्रा निघाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घरात लग्नाच्या विधी सुरु होत्या
भिंड जिल्ह्यातील गोरमी भागातील कचनाव कला गावात राहणाऱ्या रिंकू यादव याचे 22 फेब्रुवारी रोजी लग्न होते. यासाठी 20 फेब्रुवारी रोजी लग्नाचे विधी पार पडले. लग्नाच्या विधीसाठी रिंकूच्या घरी नातेवाईक आणि गावातील लोक उपस्थित होते. लोकांसाठी जेवण तयार केले जात होते.
जेवण बनवत असताना सिलेंडरचा स्फोट झाला
जेवण बनवत असतानाच स्वयंपाकघरातील छोट्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यात घरातील पाच महिलांसह 12 जण भाजले. यानंतर गावकऱ्यांनी सर्व जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले. तर रिंकूची आई, काकी, वहिनी आणि दोन बहिणींना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आले.
उपचारादरम्यान पाचही महिलांचा मृत्यू
मात्र एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान पाचही महिलांचा मृत्यू झाला. यानंतर पाचही महिलांचे मृतदेह गावी आणण्यात आले. एकाच वेळी एकाच कुटुंबातील पाच महिलांची अंत्ययात्रा पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.