उल्हासनगरात माजी नगरसेवकाला बंदुकीच्या धाकाने लुटलं, सगळा प्रकार सीसीटीव्हीत झाला कैद
हा भयानक प्रकार असल्यामुळे हिललाईन पोलीस चांगलेच सतर्क झाले आहेत. या मागचा मुख्यसुत्रधार कोण आहे ? याचा देखील पोलिस शोध घेत आहेत.
निनाद करमरकर, उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) महापालिकेचे माजी नगरसेवक मोहन साधवानी (mohan sadhwani) यांना अज्ञात लुटारूंनी बंदुकीचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली आहे. मात्र या लुटारूंनी पाळत ठेवून तसेच हातात बंदूक घेऊन ही लूट केल्यानं हा लुटीचा प्रकार होता की हल्ल्याचा प्रयत्न ? यावरून तर्क-वितर्क लढवले जातायत. हा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी (police) सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. माजी नगरसेवकाच्या गळ्यातील १५ ग्रॅमची रुद्राक्षाची माळ खेचून पळून गेल्याची तक्रार पोलिस स्टेशन दिली आहे. कालच हा प्रकार सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गोकुलधाम सोसायटीत माजी नगरसेवक मोहन साधवानी राहतात. १ एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजता साधवानी हे त्यांच्या हॉटेलमधून घरी परतले. तसेच त्यांनी इमारतीखाली कार पार्क केली, इतक्यात त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या तीन जणांपैकी एकजण आतमध्ये धावत आला आणि साधवानी यांच्या गळ्यातली १५ ग्रॅमची रुद्राक्षाची माळ खेचून पळून गेला. त्या इसमाच्या हातात बंदूक सुद्धा होती. त्यामुळं हा नक्की लुटीचा प्रकार होता? की हल्ल्याचा प्रयत्न ? यावरून तर्क-वितर्क लढवले जातायत. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतायत.
हा भयानक प्रकार असल्यामुळे हिललाईन पोलीस चांगलेच सतर्क झाले आहेत. या मागचा मुख्यसुत्रधार कोण आहे ? याचा देखील पोलिस शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं असून लवकरचं चोरटे हाती लागतील असं पोलिसांनी सांगितलं.