क्रिकेट लाईव्ह गुरु पाहून बेटिंग लावायचे, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात
सध्या आयपीएस सामने सुरु आहेत. यामुळे पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या बेटिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कंबर कसली.
शंकर देवकुळे, सांगली : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावणाऱ्या चौघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. सांगलीच्या कुपवाड परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग सुरु होते. पोलिसांनी छापेमारी करत आरोपींना बेड्या ठोकल्या. विश्वनाथ संजय खांडेकर, रतन सिष्ट्र बनसोडे, गणेश मल्लाप्पा कोळी, संतोष सुरेश पाडगे अशी अटक करण्यात आलेल्या चौघांनी नावे आहेत. आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल, दुचाकी असा 2 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. क्रिकेट सामन्याच्या हार जीतवर भाव असेल त्याप्रमाणे वाढीव भावाने पैसे देत असल्याचेही कबूल केले. चौघांविरुध्द कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस जिल्ह्यात बेटिंग कुठे सुरुय याची माहिती घेत होते
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी टाटा आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणार्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे आणि अंमलदारांचे एक पथक तयार केले. पथकातील दिपक गायकवाड, प्रशांत माळी हे जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्यांची माहिती घेत होते. यावेळी त्यांना संशयित विश्वनाथ संजय खांडेकर हा कुपवाड ते वाघमोडेनगर रोडवर कृष्णा मोरे यांच्या मालकीचे शेतात शेडमध्ये लखनऊ सुपर जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघात सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावत असल्याची माहिती मिळाली.
छापेमारी करत चौघांना अटक केली
मोबाईलद्वारे धावांवर आणि विजय, पराजय यावर बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने कृष्णा मोरे यांच्या शेतात शेडमध्ये पंचासमक्ष छापा मारला. तेथे संशयित लॅपटॉप आणि मोबाईलच्या सहाय्याने क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत होते. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत विश्वनाथ खांडेकर याने क्रिकेट लाईव्ह गुरु नावाच्या अॅपवर आयपीएलच्या सामन्याचा स्कोअर आणि हार-जीतचा भाव पाहत लोकांकडून पैसे घेत असल्याचे सांगितले. लॅपटॉप, मोबाईल, चार दुचाकी असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.