गुन्हेगारांची सुरस कथाः पठ्ठे ऐटबाज रहायचे, चारचाकीतून यायचे अन् मंगळसूत्र चोरायचे; गुजरातची टोळी नाशिकमध्ये चतुर्भुज
त्यांनी आजीबाईचं डोरलं चोरलं आणि तिथंच गावले. आता त्यांची सुरस कथा समोर आली. हे पठ्ठे म्हणे ऐटबाज रहायचे. चारचाकी वाहनातून यायचे आणि मंगळसूत्र चोरी करायचे. या टोळीला पंचवटी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
मनोज कुलकर्णी, नाशिकः त्यांनी आजीबाईचं डोरलं चोरलं आणि तिथंच गावले. आता त्यांची सुरस कथा समोर आली. हे पठ्ठे म्हणे ऐटबाज रहायचे. चारचाकी वाहनातून यायचे आणि मंगळसूत्र चोरी करायचे. या टोळीला पंचवटी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी सकाळी (10 ऑक्टोबर) पावणे अकराच्या सुमारास सुमन नारायण सोमवंशी (वय 65) या नातवाला शिंदेनगरातील मखमलाबाद रोडवरील एका कोचिंग क्लासेसमध्ये सोडून आल्या होत्या. तेव्हा त्या कोचिंग क्लासेसच्या बिल्डिंग बाहेर एक निळ्या रंगाची चारचाकी उभी होती. त्या चारचाकीमधून एक उंचापुरा आणि पांढराशुभ्र शर्ट घातलेला माणूस बाहेर पडला. त्याने काही कळायच्या आत सुमन शिंदे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र ओढले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांसमोर त्यांची शक्ती कमी पडली. चोरट्याने गंठण हिसकावून चारचाकी गाठली. त्यातून तो आपल्या टोळीसह पसार झाला. याप्रकरणी सोमवंशी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक राम घोरपडे यांनी ही माहिती पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. तिथल्या चौथ्या मजल्यावरील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते. त्यात त्यांची चारचाकी मेनरोडवरून जाताना दिसली. ही माहिती कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना देत नाकाबंदी करण्यात आली आणि चोरट्यांचा पाठलाग सुरू झाला. हे संशयित वाहन विठ्ठल रुक्मिणी मंगळ कार्यालयाजवळच्या मारुती मंदिरासमोर पोलिसांनी अडवले. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांनी दुचाकीवरून तोपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय गाठले आणि चौघांना बेड्या ठोकल्या. ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक अशोक साखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस उपनिरीक्षक राम घोरपडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंबादास जाधव, पोलीस शिपाई विलास जारवाल यांनी केली.
इतर गुन्ह्यांचा तपास सुरू
जयसिंग हरीराम यादव (वय 25), पंकज परशुराम यादव (वय 20), कुलदीप भगवानदीप यादव (वय 20) आणि संदीप उमाशंकर यादव (वय 28) अशी आरोपींची नावे असून, ते सर्वजण गुजरातमधल्या सिल्व्हासा (जि. बलसाड) येथील आहेत. त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत केले. त्यांनी चारचाकी वाहनासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी अशा प्रकारे इतर गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
इतर बातम्याः
मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोध
Gold price: सोने स्वस्तच, पण महाराष्ट्र बंदमुळे नाशिकमध्ये अनेक सराफा दुकान बंद!
धक्कादायकः खेळता-खेळताच ग्राऊंडवर कोसळला, चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या किक्रेटपटूचा नाशिकमध्ये मृत्यूhttps://t.co/t7TpO8YCjL#Nashik|#cricket|#deathduetodizziness|#deathofayouthontheground
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021