गँगमध्ये सहभागी का होत नाहीस ? म्हणत मित्रांनीच मित्राचा…, खळबळजनक घटनेने जिल्हा हादरला !
सांगलीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच एक घटना काल मध्यरात्री उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सांगली : सांगली एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. गँगमध्ये सहभागी का होत नाहीस? म्हणत मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील इस्लामपुरात घडली आहे. या घटनेमुळे इस्लामपूर शहरात एकच खळबळ माजली आहे. शहरातील सराईत गुन्हेगार प्रकाश महादेव पुजारी याची मंगळवारी मध्यरात्री डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याच्या मित्रांनीच हत्या केली. या प्रकारानंतर इस्लामपूर शहरात एकच खळबळ माजली आहे. इस्लामपुरातील नवीन बहे नाका परिसरातील चौकात मल्हार बारसमोर हा प्रकार घडला. हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. मृत प्रकाशचे गुन्हेगारी क्षेत्रातील मित्र गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार यांनी चॉपर आणि दगड वीटांनी हल्ला चढवला.
गँगमध्ये सहभागी होत नव्हता म्हणून हत्या
प्रकाश पुजारी हा संशयित गजराज पाटील आणि त्याचे साथीदार हे त्याच्या गँगमध्ये सामिल होत नाही म्हणून प्रकाशवर खुन्नस ठेवून होते. या कारणाचा राग मनात धरून त्यांच्यामध्ये सतत धुसफूस सुरू होती. प्रकाश त्याच्या मित्रांसोबत मंगळवारी रात्री बारमध्ये दारू पित बसला होता. तेथे येवून गजराज पाटील याने प्रकाश बरोबर वादावादी केली. त्यानंतर गजराजने प्रकाशच्या डोक्यावर हल्ला चढवला. तर सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल आणि त्यांचा अनोळखी साथीदार यांनी लाथाबुक्क्यांनी आणि दगड-विटाने मारहाण करून त्याची हत्या केली.
पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरु
याबाबत रोहन रविंद्र इच्चुर याने फिर्याद दिली आहे. सर्व आरोपींवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.