पार्क केलेल्या रिक्षा चोरायचे, पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या आरोपींच्या मुसक्या
सदर आरोपी इसम हे चारकोप परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून चारकोप येथील पुजा बिल्डिंग व हिंदुस्थान नाका येथील रिक्षा स्टॅन्डवर पोलीस पथकातील मोरे, सवळी यांनी रिक्षाचालक बनून सलग 3 दिवस पाहणी केली.
मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : मुंबईत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास एमएचबी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तीन दिवस रिक्षा चालक बनून रिक्षास्टँडवर थांबले. अब्दुल अब्दुल अजीज मोमीन आणि भूषण लिंगपल्ली उर्फ शैलेश लिंगमपल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही कांदिवलीतीव रहिवाशी आहेत. आरोपींना महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘असा’ झाला चोरट्यांचा पर्दाफाश
अजय कुमार अभिमन्यू यादव यांनी त्यांची रिक्षा दहिसर पश्चिमेतील कॅन्सर हॉस्पिटल येथे पार्क करून जेवण करण्यासाठी गेले होते. याचदरम्यान अज्ञात इसमाने त्यांची रिक्षा चोरी केली. याप्रकरणी यादव यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. यादव यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला.
रिक्षाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्हीमध्ये सदरची रिक्षा ही वेस्टर्न एक्स्प्रेसमार्गे जोगेश्वरीच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. मात्र पुढे रिक्षाबाबत काहीच माहिती मिळाली नाही. त्यावरून वपोनि कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गुन्हे सचिन शिंदे, सपोनि पवार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील इतर ठिकाणी झालेल्या ऑटो रिक्षा चोरीमधील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी इसमांचा शोध घेतला.
पोलिसांनी रिक्षा चालक बनून तीन दिवस केली पाहणी
सदर आरोपी इसम हे चारकोप परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून चारकोप येथील पुजा बिल्डिंग व हिंदुस्थान नाका येथील रिक्षा स्टॅन्डवर पोलीस पथकातील मोरे, सवळी यांनी रिक्षाचालक बनून सलग 3 दिवस पाहणी केली. तीन दिवसानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसणारे आरोपीत इसम 21 फेब्रुवारी रोजी रिक्षा चोरी करण्याकरीता जात असताना पोलीस शिपाई सवळी यांच्या निदर्शनास दिसून आले.
आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी नवघर पोलीस ठाणे, भाईंदर, कांदिवली पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे तसेच एम.एच.बी पोलीस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.