Kalyan Gutkha Seized : कल्याणमध्ये लाकडाच्या भुशाच्या कंटेनरमधून गुटख्याची तस्करी, 25 लाखाच्या मुद्देमालासह तीन जणांना बेड्या
कंटेनरची तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये फोर के स्टार नावाचा गुटख्याचा मोठा साठा मिळून आला. या गुटख्याची बाजारातील किंमत 25 लाख रुपये आहेत. पोलिसांनी या गुटख्याची तस्करी करणाऱ्या कंटनेर चालकासह तिघांना अटक केले आहे.
कल्याण : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी असताना देखील आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. उल्हासनगर अंबरनाथ व बदलापूर तसेच कल्याण व आसपासच्या शहरात कंटेनरच्या माध्यमातून लाखोंच्या गुटख्याची तस्करी (Gutkha Smuggling) केली जात आहे. सण उत्सवाच्या काळात डेकोरेशनसाठी वखारीतील लाकडाच्या भुशाला वाढती मागणी आहे. या भुशाच्या कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कल्याण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 25 लाखांचा गुटखा जप्त (Seized) करण्यात आला असून, तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. मशाक इनामदार, लव सहानी, प्रेमचंद वाठोरे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी केली कारवाई
कर्नाटकहून उल्हासनगरला शनिवारी रात्री कल्याण गांधारी मार्गे गुटख्याचा कंटेनर येणार असल्याची माहिती कल्याण झोन 3 च्या डीसीपी स्कॉडचे पोलिस कर्मचारी संजय पाटील आणि ऋषिकेश भालेराव यांना मिळाली. त्यानुसार डीसीपी स्कॉड आणि खडकपाडा पोलिसांनी गांधारी रोडवर सापळा रचला आणि भिवंडी पडघा मार्गे कल्याणमध्ये येत असलेला गुटख्याचा एक कंटनेर पोलिसांनी अडवला. त्या कंटेनरची तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये फोर के स्टार नावाचा गुटख्याचा मोठा साठा मिळून आला. या गुटख्याची बाजारातील किंमत 25 लाख रुपये आहेत. पोलिसांनी या गुटख्याची तस्करी करणाऱ्या कंटनेर चालकासह तिघांना अटक केले आहे.
कर्नाटकहून उल्हासनगरला आणण्यात येत होता गुटखा
पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता हा गुटखा कर्नाटकहून उल्हासनगरला आणण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. हा गुटखा कोण खरेदी करणार होता. या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. सध्या कल्याण खडकपाडा पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Gutkha smuggling busted in Kalyan, three arrested with worth Rs 25 lakh tobacco products)