वृद्ध महिलांना हेरायचे, मग रस्त्यावर दागिने ठेवून भुलवायचे आणि खरे दागिने घेऊन पसार व्हायचे !
चोरटे काय करतील याचा नेम नाही. पुण्यात महिलांना लुटण्यासाठी चोरट्यांनी आता नवा फंडा अंमलात आणला आहे. चोरांची ही शक्कल पाहून पोलीसही हैराण झाले.
पुणे / अभिजीत पोते : पुण्यात दागिने लुटण्यासाठी चोरट्यांचा नवा फंडा ऐकाल तर तुम्हीही हैराण व्हाल. मात्र हडपसर पोलिसांनी या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून 128 ग्रॅम सोने हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपींचा लुटीचा प्रकार उघड होताच पोलीसही चक्रावून गेले. रस्त्यावर खोटे सोने ठेवून महिलांना भुलवायचे. मग त्या सोन्याच्या बदल्यात त्यांच्याकडील खरे सोने घेऊन पसार व्हायचे. चोरट्यांनी आतापर्यंत किती महिलांना गंडा घातला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
चोरट्याची ही टोळी हडपसर, गाडीतळ, कात्रज, भोसरी परिसरात वृद्ध महिलांना हेरायची. महिलांच्या बसण्याच्या ठिकाणी रस्त्यावर बनावट दागिने टाकून सापळा लावून बसायचे. महिला दागिने पाहून उचलायला गेल्या की चोरटे महिलांजवळ यायचे. दागिने उचलताना आम्ही तुम्हाला पाहिले आता यातील अर्धा हिस्सा आम्हाला द्या म्हणायचे.
महिला दागिने पाहून अर्धा हिस्सा देण्यास नकार द्यायचे. मग चोरटे त्यांच्याकडे अंगावरील दागिन्यांची मागणी करायचे. रस्त्यावर पडलेले सोने पाहून महिला भुलायच्या आणि अंगावरील दागिने काढून द्यायच्या. चोरटे दागिने घेऊन पसार व्हायचे. नंतर घरी जाऊन तपासले असता दागिने खोटे असल्याचे निष्पन व्हायचे.
हडपसर पोलिसांकडून टोळक्याला बेड्या
याप्रकरणी हडपसर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत या टोळक्याला जेरबंद केले. या टोळीत एकूण पाच आरोपींचा समावेश असून, पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी आतापर्यंत किती महिलांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.