Moral Policing : मध्यरात्री तो त्याच्या मैत्रीणीला भेटायला गेला आणि धक्कादायक घडले
एका आठ तरूणांच्या गटाने एका बस ड्रायव्हरला तो त्याच्या विवाहित मैत्रीणीला मध्यरात्री भेटायला गेला असता बेदम चोप दिला
केरळ : मध्यरात्री आपल्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी जाणे एका तरूणाला महागात पडले आहे. हा तरूण मध्यरात्री त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेला आणि त्याला ‘मोरल पोलीसिंग’च्या ( Moral Policing ) नावाखाली एका गटाने बेदम मारहाण केल्याने तो जखमी होऊन त्याचा रूग्णालयात मृत्यू झाल्याचा प्रकार केरळच्या त्रिशूरमध्ये ( Thrissur ) घडला आहे. या प्रकरणात पोलीसांनी आठ जणांविराेधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत.
केरळच्या त्रिशूरमध्ये एका आठ तरूणांच्या गटाने एका अविवाहीत तरूणाला तो त्याच्या विवाहित मैत्रिणीला मध्यरात्री भेटायला गेला असता बेदम चोप दिल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका मंदिराजवळ लागलेल्या कॅमेऱ्यात हा सर्व घटनाक्रम चित्रीत झाला. 18 फेब्रुवारीला ही धक्कादायक घटना घडली असून या जखमी बस चालकाचा त्रिशूरच्या एका रूग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला आहे.
मोरल पोलिसिंगचा धक्कादायक प्रकार केरळच्या त्रिशूरमध्ये घटला आहे. सहर हा पेशाने बस ड्रायव्हर असलेला अविवाहित तरूण त्याच्या विवाहित मैत्रिणीला मध्यरात्री भेटायला गेला होता. तेव्हा आठ जणांच्या एका ग्रुपने त्याला जाब विचारत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, विशेष म्हणजे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा घटनाक्रम चित्रीत झाला आहे.
मैत्रीणीचा फोन आला आणि घात झाला
पोलिसांनी प्रसारमाध्यमाला दिलेल्या माहितीनूसार चेरपू येथील या तरूणाला त्याच्या मैत्रिणीचा मध्यरात्री फोन आला म्हणून तो तिला भेटायला गेला. या तरूणाला त्या विवाहित महिलेच्या घराजवळ दबा धरून बसलेलया एका गटाने आधी जाब विचारला आणि नंतर लाथाबुक्क्यांनी बेदम चोपले. या जखमी तरूणावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात राहूल, बिजिथ, विष्णु, बीनू, अरुण, अभिलाष या तरूणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मंदिरातील सीसीटीव्हीत घटना चित्रीत
घटनास्थळावरील मंदिरात तरूणाला झालेल्या बेदम मारहाणीचा घटनाक्रम चित्रीत झाला आहे. आरोपी तरूण घटनेनंतर फरार झाले आहेत. पोलीस या तरूणांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तरूणाच्या किडन्या आणि बरगड्यांना जबर मार लागण्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.